24 तासात खुलासे द्या; तहसीलदारांचे आदेश
पारनेर । लतिफ राजे - 03-Jan, 2021, 12:00 AM
पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यासंदर्भात शनिवारी तहसील कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र या प्रशिक्षणाला प्राध्यापक, शिक्षक व इतर अशा 112 जणांनी दांडी मारली. या सर्व दांडीबहाद्दरांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. निवडणुकीस गैरहजर असलेल्या तालुक्यातील तब्बल 112 जणांना नोटीसा बजावत खुलासे मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींची सध्या रणुधमाळी सुरू आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी काल शनिवारी निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणास सुमारे 1600 कर्मचारी उपस्थित होते. यात महिला कर्मचारी यांची संख्या लक्षणीय होती.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी निवडणूक कामकाजा संदर्भात मार्गदर्शन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच आपले निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते निष्पक्ष पार पाडण्याचे आवाहन केले. शनिवारी झालेल्या प्रशिक्षणास तब्बल 112 जणांनी दांडी मारली. या दांडी बहाद्दरांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी 45, निवडणूक अधिकारी क्रमांक एक 14, अधिकारी क्रमांक दोन 12, अधिकारी क्रमांक तीन 10 व शिपाई 31 अशा एकूण 112 जणांचा समावेश आहे.
प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या 112 दांडीबहाद्दरांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी नोटीसा पाठवून खुलासे मागवले आहेत. या दांडी बहाद्दरांमध्ये पारनेर मधील एका नामांकित महाविद्यालयाच्या 23 प्राध्यापकांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना नेमून दिलेल्या कामांमध्ये हलगर्जीपणा दाखवल्यास त्यांना निलंबित करणे, वागणुकीबद्दल अहवाल पाठविणे, शिस्तभंगाची कारवाई करणे यासाठी खुलासा मागविला जातो. त्याप्रमाणे सदर 112 जणांना तहसिलदार ज्योती देवरे यांनी नोटीसा पाठवून 24 तासात खुलासा मागितला आहे.
Comments