कुलबा हवामान विभागाचा अंदाज
अहमदनगर । वीरभूमी- 30-May, 2021, 12:00 AM
सलग तीन दिवसापासून नगर जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे आगामी पुढील चार दिवसही गडगडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज कुलबा वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतकर्यांनी शेतातील कामे आटोपून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
मागील गुरुवारपासून राज्यातील काही भागात वादळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्याप्रमाणे मागील तीन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आगामी चार दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवार असे चार दिवस गडगडाटासह वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज रविवार दि. 30 मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वेगवान वादळासह (30 ते 40 किमी. प्रतितास वेगाने) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवार दि. 31 मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वेगवान वादळासह (30 ते 40 किमी. प्रतितास वेगाने) हलकासा पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवार 1 जून, बुधवार 2 जून व गुरुवार दि. 3 जून रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वेगवान वादळासह (30 ते 40 किमी. प्रतितास वेगाने) हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शनिवारी जिल्ह्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात वीज पडून एका महिलेसह चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. तसेच अनेक भागातील घरांची पत्रे उडाली. अनेक झाडांवरील आंबे, चिक्कू, केळी या पिकांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले.
तसेच वीट भट्ट्ी चालकांचेही नुकसान झाले आहे. मात्र सध्या साखर कारखान्यांचे हंगाम संपल्याने ऊस तोडणी मजुर आपल्या घरी पोहोचल्याने त्यांचे हाल थांबले. शेतकर्यांनी आमागी चार दिवस काळजी घेऊन आपल्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. उघड्यावर असलेला कांदा, चारा पिके, फळे यांचे नुकसान टाळण्यासाठी झाकुन ठेवावे.
Comments