राज्यात अनलॉकचे पाच टप्पे; सोमवारपासून अंमलबजावणी
राज्य सरकारची मध्यरात्री अधिसुचना । सर्वसामान्यांना दिलासा
मुंबई । वीरभूमी- 05-Jun, 2021, 12:00 AM
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री काढली. यानुसार जिल्ह्यातील रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हिटी टक्केवारी तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी या निकषाआधारे जिल्ह्यांची विभागणी होईल. यात उपरोक्त निकषांआधारे पाच टप्पे करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांचे स्वरूप लागू असेल. उदा. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के व ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असतील त्या जिल्ह्यांत जवळपास पूर्ण अनलॉक असेल. याआधारे पुढील चार टप्पे असतील.यानुसार अहमदनगर जिल्ह्याचा तिसर्या टप्प्यात समावेश होत असल्याने जिल्ह्यात बहुतांश कठोर निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक दुकानांना सायंकाळी 4 पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा मिळणार आहे. ही अधिसुचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आली आहे.
राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठीचे पुढील प्रमाणे पाच टप्पे केले आहेत. यामध्ये (1) पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के व ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत. (2) पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के व ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत. (3) पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के व ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील. (4) पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के व येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील. (5) पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांपेक्षा जास्त आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.
राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार अनलॉकचे नियम पुढील प्रमाणे पाच टप्प्यांत असणार आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 4.30 टक्के असून ऑक्सिजन बेड 24.48 टक्के एवढा असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा समावेश तिसर्या टप्प्यामध्ये होत आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत पहिल्या टप्प्यात - अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. खासगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील. थिएटर सुरू होतील, चित्रपट शूटिंगला परवानगी, लग्न सोहळा, सार्वजनिक कार्यक्रम यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई-कॉमर्स सुरू राहील. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. सलून, जिम सुरू राहणार आहेत. बस 100 टक्के क्षमतेने सुरू होतील. इतर राज्यांतून येणार्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहील.
दुसर्या टप्प्यात - अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह सुरू. मॉल्स, थिएटर्स 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. लग्नकार्यात हॉलच्या 50 टक्के क्षमता वा 100 माणसांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. कार्यालयांत 100 टक्के उपस्थिती असू शकेल. बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण. ई-सेवा पूर्ण जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू. बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने.
जिल्ह्याच्या बाहेर लाँग ट्रेन, खासगी कार, खासगी गाड्या, टॅक्सी, बसेस, यांना परवानगी आहे. कृषी, बांधकामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाइन, ई-कॉमर्स सुरू करण्यात आले आहे. जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस 100 क्षमतेने टक्के सुरू असतील. उभे राहून प्रवास करता येणार नाही.
तिसर्या टप्प्यात - अत्यावश्यक दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुली, दुपारी 2 पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मॉर्निंग वॉक, सायकलिंग, मैदाने पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा राहील. खासगी आणि शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू.
आऊटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 5 ते 9 सुरू असतील. स्टुडिओत चित्रीकरण परवानगी, मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार. हे सोमवार ते शुक्रवार या वेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकामांना दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई-कॉमर्स दुपारी 2 पर्यंत सुरू असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
चौथ्या टप्प्यात - अत्यावश्यक सेवा 4 वाजेपर्यंत सुरू असतील. इतर दुकाने बंदच राहतील. चित्रपटगृहे, मॉलही बंदच राहतील. रेस्तराँमध्ये फक्त पार्सललाच परवानगी असेल. सरकारी, खासगी कार्यालयांत 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी 5 ते 9 पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरू राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
लग्न समारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील. संचारबंदी लागू असणार आहे. सलून, जिम दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभे राहता येणार नाही.
पाचव्या टप्प्यात - सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार-रविवार मेडिकल वगळता सर्वच बंद. इतर सर्व दुकाने बंदच राहतील. रेस्तराँत फक्त पार्सलला परवानगी. संचारबंदी लागू. इतर सर्व बंद असेल.
सर्व टप्प्यामध्ये अत्यावश्यक सेवा सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. तर अर्थकारणाला वेग येणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Tags :
Comments