रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करत गांधीगिरी
बोधेगाव । वीरभूमी- 25-Jul, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील बसस्थानक रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता चिखलाने माखला आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. याच्या निषेधार्थ बोधेगाव येथील खड्ड्यांमध्ये डॉ. क्षितीज घुले युवा मंचच्या वतीने वृक्षारोपण करत निषेध करण्यात आला.
या निषेध आंदोलनात डॉ. क्षितिज घुले युवा मंचचे अनिल घोरतळे, सचिन घोरतळे, सिध्दांत घोरतळे, प्रसाद पवार, मनोज घोरतळे, तुषारा जायगुडे, चेतन देशमुख, ज्ञानेश्वर घोरतळे, हारुण बागवान आदींनी सहभाग घेतला.
गेल्या कित्येक वर्षापासून बोधेगाव बसस्थानक परिसरातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त दुर्लक्ष करत निवेदनांना केराचीच टोपली दाखविण्यात आली.
पावसाळा सुरु झाला की, रस्त्यावर अर्धा ते 1 फुटापर्यंत खड्डे पडून अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. हा राज्यमार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा प्रमुख रस्ता असुन या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते. बसस्थानका समोरील रोडवर मोठ मोठे खड्डे पडले असून पावसामुळे डबके साचले आहे.
पाण्यामुळे वाहनचालकाला या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत व अनेक राजकिय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यानी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा लेखी व तोंडी कळवून सुध्दा काहीच उपयोग झाला नाही.
गेल्या वर्षी मे महिण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने थातुर मातुर खड्डे बुजवण्याचे काम केले होते. खड्ड्यांध्ये खडी टाकुन डांबराचा शिडकाव केला होता. अत्यंत निकृष्ट पध्दतीने काम झाल्याने यावर्षी पहिल्याच पावसात त्याच जागी मोठ मोठे खड्डे पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या कामात मात्र लाखो रुपये मिळवले.
येत्या आठ दिवसात चांगल्या पध्दतीने हे खड्डे न बुजवल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा डॉ. क्षितिज भैय्या घुले युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
UiFSMswOeZXyBrA