आर्थिक देवाणघेवाणीवरून राडा झाल्याची चर्चा । संपर्क प्रमुखालाही मारहाण झाल्याची चर्चा
अहमदनगर । वीरभूमी - 30-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज आल्याने आज होणार्या ऑनलाईन सभेत बिनविरोध निवडीची घोषणा होणार आहे. मात्र तत्पुर्वीच शिवसेनेच्या दोन गटांत मध्यरात्री राडा झाला.
यामध्ये निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेवाराच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. तर इतर नगरसेवक आणि पदाधिकार्यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर मुंबईहून आलेल्या पदाधिकार्यालाही मारहाण झाली आहे. हा राडा महापौर निवडीच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून झाल्याचे सांगण्यात येत असून हा वाद कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.
अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडीसाठी शिवसेकडून दोन महिला उमेदवार इच्छुक होत्या. मात्र मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर इच्छुक असलेल्या शिला भाकरे यांनी माघार घेतल्याचे सांगितल्यानंतर महापौरपदासाठी रोहिणी शेंडगे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे महापौरपदासाठी रोहिणी शेंडगे यांचा शिवसेनेकडून एकमेव अर्ज दाखल झाला. महापौर पदासाठी शेंडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने आज बुधवारी होणार्या ऑनलाईन सभेत औपचारिक घोषणा होणार आहे.
तत्पुर्वीच मंगळवारी मध्यरात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान शिवसेनेच्या दोन गटामध्ये फ्रिस्टाईल झाली. प्रारंभी नगरसेवक अनिल शिंदे व माराघ घेतलेल्या शिला भाकरे यांचे पती यांच्यात शाब्दीक चकमक झाली. या चकमकीतूनच पुढे मोठा राडा झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये शिला भाकरे यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. तसेच शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम व अनिल शिंदे यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच मुंबईहून महापौर निवडीसाठी आलेले शिवसेना संपर्कपमुख भाऊ कोरोगावकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाकरे यांनी आपल्याला संभाजी कमद व त्यांच्या माणसांकडून मारहाण झाल्याचे सांगितले तर कदम आणि शिंदे यांनी भाकरे यांच्याकडून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.
या मारहाणीनंतर हे प्रकरण थेट कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. दरम्यान भाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माझ्या पत्नीने महापौर निवडीतून माघार घेतली आहे. मात्र माझ्यावर पैसे मागितल्याचा आरोप करत शिंदे व कदम यांच्याकडून मारहाण झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान आपल्याला दिवसभर दारू पाजून जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली. या मारहाणीमध्ये गळ्यातील सोन्याची साखळीही काढून घेतली, अशी तक्रार भाकरे यांनी केली आहे.
दरम्यान आज बुधवारी महापौर निवडीसाठी ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौरपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार असून औपचारिकता बाकी आहे. यामुळे आज होणार्या सभेत त्यांच्या नावाची महापौर म्हणुन घोषणा होणार आहे. मात्र मंगळवारी रात्रीच शिवसेनच्या दोन गटामध्ये राडा झाल्याने खळबळ उडाली आहे.
Comments