दुहेरी हत्याकांडाचा तपास लागत नाही तोच शेवगावात आढळला तरुणाचा मृतदेह
शेवगाव । वीरभूमी - 27-Jan, 2021, 12:00 AM
रविवारी शेवगावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास लागला नाही तोच
शेवगाव - नेवासा रस्त्यावरील ढोरा नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मयताचे नाव जय राजेश वखरे (वय-२१) असे असून त्याच्या खिशात सापडलेल्या दोन आधार कार्डवर परभणी व बीड असे वेगवेगळे रहिवाशी ठिकाण आहेत. मात्र ही हत्या की आत्महत्या याबाबत नागरीकांमध्ये चर्चा सुरु आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव - नेवासा रस्त्यावरील ढोरा नदी पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही जणांनी आज बुधवार २७ रोजी दुपारी पाहीले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पो. हे. काँ. मरकड, बप्पासाहेब धाकतोडे, वैजनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला.
त्यावेळी त्याच्या अंगात पुर्ण बाह्याचा इन केलेला शर्ट व जीन्स पँन्ट आढळून आली. त्याच्या चेह-यावर मारहाणीच्या जखमा आहेत. तर खिशामध्ये सापडलेल्या दोन आधार कार्डवर जय राजेश वखरे (वय-२१) असे असून रहिवाशी ठिकाण मात्र परभणी व बीड असे दोन वेगवेगळे आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, शहरात दोन दिवसापूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच आज पुन्हा तरुणाचा मृतदेह आढळल्याने शेवगाव शहर व परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
Comments