दुहेरी हत्याकांडाचा तपास लावण्यात शेवगाव पोलिसांना यश
बिडकिन येथून एका जणाला घेतले ताब्यात
शेवगाव । वीरभूमी - 31-Jan, 2021, 12:00 AM
मागील रविवारी (दि. 24 रोजी) शेवगाव शहरात उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात शेवगाव पोलिसांना आज रविवारी यश आले.हे हत्याकांड आर्थिक देवाण घेवणीतून झाले असून मयत व मारेकरी दोन्हीही एकमेकांचे नातेवाईक असून मुळ राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास एका सीसीटीव्ही फुटेजवरून लावले असून एका जणाला औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन भागातून अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली असून या हत्याकांडात आणखी काहींचा सहभाग असल्याचे पोलिस निरिक्षक प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
मागील रविवारी (दि. 24 रोजी) शहरातील पाथर्डी रोडवरील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळ्या जागेत एका महिलेचा मुंडके कापलेला व त्या शेजारी 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून होता.
घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला वेग दिला होता. मयत महिलेचे मुंडके गायब झाल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.
या दुहरे हत्याकांडाच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्यातील तीन पथके तैनात करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका फुटेजमध्ये मयत मुलगा एका व्यक्तीबरोबर चालतांना आढळून आला. यावरून या व्यक्ती या राजस्थानी असून आपल्या भागात जडीबुटी औषधी विक्री करणारी असल्याचे निष्पन्न झाले.
या दुहेरी हत्याकांडातील मयत महिलेचे नाव कमलाबाई कागडिसिंग चितोडिया (वय 60) व मुलाचे नाव सुनील उर्फ टकला चितोडिया (वय 12) असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी सापडलेल्या महत्वाचे धागेदोरे व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घटनेचा तपास लावला.
या सीसीटीव्ही फुटेज व इतर धागेदोरे यावरून नेमून दिलेल्या तीन पथकापैकी चार जणांचे एक पथक मध्यप्रदेश, इंदौर तर दुसरे पथक मध्यप्रदेश शिवपुरी, नरवर, गुना येथे पाठवले होते. त्यातील दुसर्या पथकाला संबंधीत मयताच्या नातेवाईकांकडून मयताबरोबर असलेल्यांची माहिती मिळाली.
त्यावरुन तिसर्या पथकाने बिडकीन व नवगाव (जि. औरंगाबाद) येथून एका जणाला ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून शेवगाव येथे आणून अटक केली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव नेकपालसिंग कोटीयासिंग चितोडीया (वय-70, मुळ रा. चित्तोडगड, राजस्थान. हल्ली रा. बिडकीन, जि. औरंगाबाद) असे असून त्याने हत्या करून महिलेचे मुंडके घटनास्थळापासून जवळ असलेल्या अहिल्यानगर परिसरात टाकल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना मांस नसलेली कवटी आढळून आली.
पोलिसांनी आणखी कसून चौकशी केली असता त्याने आर्थिक देवाण घेवाणीवरून हत्या केल्याचे सांगत यामध्ये आणखी काही जणाचा समावेश असल्याचे सांगितले. मात्र संबधित पसार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
पोलिसांनी पसार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाले असून सापडलेली कवटी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे.
WSQExdXCtNpgcorY