शेवगाव पोलिसांची कारवाई । चार दुचाकी हस्तगत
शेवगाव । वीरभूमी - 03-Feb, 2021, 12:00 AM
शेवगाव शहर व तालुक्याची कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिव ढासळत चालली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून खून, लुटमार, चोर्यामध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शेवगाव पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
अशाच प्रकारे बंदोबस्तावरील पोलिसांना खानापूर-रावतळे, कुरुडगाव रोडवरील हॉटेल शिवार येथे एक आरोपी आल्याची माहिती समजताच त्याला सापळा रचुन अटक केली असता त्याकडे एक गावठी कट्टा सापडला. तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरलेल्या चार दुचाकीही त्याकडून हस्तगत केल्या आहेत.
अटक केलेल्या आरोपीचे नाव नामदेव भागवत वटाने (मुळ रा. सावळेश्वर, पोस्ट- राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड. हल्ली रा. कुरूडगाव, ता. शेवगाव) असे असून त्याकडून गावठी कट्टा व चोरीची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रभाकर पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोसई. सोपान गोरे, पोलीस अंमलदार बाबासाहेब शेळके, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, वासुदेव डमाळे, संदीप दरवडे, किशोर शिरसाठ यांनी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत खानापुर ते रावतळे, कुरूडगाव जाणारे रोडलगत असणारे हॉटेल शिवार यास चोहोबाजुने घेराव करुन सापळा रचुन अचानक छापा टाकुन नामदेव भागवत वटाने (मुळ रा. सावळेश्वर पोस्ट- राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. कुरूडगाव, ता. शेवगाव) यास गावठी कट्टा (पिस्टल) व चोरीची मोटार सायकलसह शिताफीने ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या विविध कंपनीच्या चार मोटार सायकल त्याचेकडुन हस्तगत केल्या आहेत.
सदर आरोपीविरूध्द पोलीस अंमलदार वासुदेव डमाळे यांचे फिर्यादीवरून गु.र.नं. 55/2021 भा.दं.वि.सं.कलम 379 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई. एस. आर. गोरे हे करीत आहेत.
Comments