‘नागवडे’च्या सर्व सभासदांना मतदानाच्या हक्कासाठी ठराव; राजेंद्र नागवडे यांची माहिती
श्रीगोंदा । वीरभूमी - 21-Feb, 2021, 12:00 AM
सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीकरीता सर्व उत्पादक सभासदांबरोबरच सर्व सभासद सहकारी संस्थांनाही मतदाना हक्क मिळवून देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने ठराव करत याला मंजुरी मिळण्यासाठी ठरावाच्या नकलेसह प्रादेशिक सहसंचालक (साखर), अहमदनगर यांचेकडे मागणी केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली आहे.
सहकार विभागाच्या नियमानुसार कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता काही सभासद व सहकारी संस्था सभासद यांना मतदानाचा हक्क मिळू शकत नाही. तथापि कारखान्याच्या सर्व व्यक्ती सभासद व सभासद सहकारी संस्था यांना मतदानाचा हक्क मिळावा याकरीता कारखाना प्रशासन सुरुवातीपासुन प्रयत्नशिल आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता महिला सभासदांना उपस्थित राहणे शक्य होत नाही.
त्याचप्रमाणे काही वैयक्तीक, कौटुंबिक किंवा अन्य कारणांमुळे काही पुरुष सभासदांनाही उपस्थित राहाणे शक्य होत नाही. अशा अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करुन तसा ठराव व त्यांना कारखान्याच्या अंतीम मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता कारखान्याने प्रादेशिक सह संचालकांना विनंती केलेली आहे.
त्याचप्रमाणे काही सभासदांची समभागाची रक्कम अपुर्ण आहे तर काही सभासदांचा मागील पाच वर्षात एकदाही ऊस गळीतास आलेला नाही. त्यांनाही ठरावाद्वारे अपूर्ण भागाची रक्कम भरण्यास मुदतवाढ देवून मतदानास पात्र ठरविण्याची मागणी प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांच्याकडे केलेली आहे.
त्याचप्रमाणे कारखान्याच्या सभासद असणार्या काही संस्थांचे प्रतिनिधी कारखाना वार्षिक सभेस उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या संस्था सहकार विभागाच्या नियमानुसार अक्रियाशिल ठरविल्या गेल्या होत्या.
परंतु त्यांची अनुपस्थिती संचालक मंडळाचे ठरावान्वये क्षमापित करुन सर्व सहकारी सभासद संस्थांना आगामी निवडणुकीत पात्र ठरविण्यात यावे व त्यांचा समावेश अंतीम मतदार यादीत करावा अशी मागणी कारखान्याने प्रादेशिक सहसंचालक (साखर), अहमदनगर यांच्याकडे केली असल्यामुळे कारखान्याचा कोणीही व्यक्ती सभासद अथवा सहकारी संस्था सभासद मतदानापासुन वंचीत रहाणार नाही.
याबाबत कुठल्याही, चर्चा, अफवा अथवा बातम्यांवर सभादांनी विश्वास ठेवू नये. ‘नागवडे’ कारखाना व सभासद यांचे विश्वासाचे अतुट नाते आहे हे भविष्यातही राहिल. सभासदांच्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. त्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशिल असल्याची माहिती राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.
Comments