अहमदनगर । वीरभूमी - 06-Mar, 2021, 12:00 AM
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. आज शनिवारी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या दोन्ही नावावर शिक्कामोर्तब झाले.
उदय शेळके यांच्या रुपाने बँकिंग क्षेत्रातील दांडगा अभ्यास असलेले तरूण नेतृत्व मिळाले तर कानवडे यांच्या रुपाने जुने जानते नेतृत्व मिळाले.
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची शनिवारी दुपारी 1 वाजता बँकेच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात बैठक झाली. त्यामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीला सर्व संचालक हजर होते. सुरुवातीला अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर अर्जांची छाननी झाली. दोन्ही पदांसाठी दोघांचेच अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे संचालक उपस्थित होते.
निवड प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या बंगल्यावर नव्या संचालकांसमवेत बैठक झाली. तिथे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे उदय शेळके तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
या दोन्ही निवडीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज सकाळीच नगरमध्ये दाखल झाले होते. अपेक्षेप्रमाणे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आले आहे.
TehMCoGyd