बालमटाकळीतील घटना । जळालेल्या पेंढ्याचा ढिगारा पाहून शेतकर्यांचे अश्रू अनावर
बोधेगाव । वीरभूमी - 17-Mar, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांच्या शेवगाव-गेवराई महामार्गलगतच असणार्या स्वतःच्या मालकीच्या गट नंबर 196/1/1 मधील अंदाजे आर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील काढणी करून शेतात पसरलेल्या अवस्थेतील गव्हाच्या पेंढ्या एका जागेवर जमा करून तो ढिगारा रात्रीच काही अज्ञात इसमांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा दि. 16 मार्च रोजी मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे.
सदरील घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांची तीन एकर शेतजमीन बालमटाकळी शिवारात शेवगाव-गेवराई महामार्गालगतच असून सदरील जमीन ही कसण्यासाठी (बटाईने) बालमटाकळी येथील शेतकरी दिगंबर टोके यांनी केलेली आहे.
तसेच टोके यांनी या जमिनीवर उत्तम प्रकारे गव्हाचे पीक पोटच्या मुलासारखे तसेच तळ हाताच्या फोडाप्रमाणे तीन ते चार महिने रात्रंदिवस राब, राब काबाड कष्ट करून, उसनवारी पैसे गोळा करून खत, पाणी घालून जगविलेले गव्हाचे पीक हे स्वतःच्या डोळ्याने सकाळी जळालेल्या अवस्थेत पाहिले. त्यांचे या घटनेने फार आतोनात नुकसान झाले आहे. पेटवून दिलेले गव्हाचे ढिगारे पाहून टोके यांचे अश्रू अनावर झाले.
सदरील घटनेची माहिती समजताच शेतकरी दिगंबर टोके यांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्र तसेच महसूल आणि कृषी विभागाला कळवली असून घटनास्थळी बोधेगाव दुरक्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा पवार यांनी भेट दिली. तसेच महसूल विभागाचे कोतवाल रामजी भोंगळे व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक भीमराव काटकर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन घटनेची रीतसर पाहणी केली.
शेतकर्याचा गहु जळाल्याने मोठे नुकसान झाले असून संबधित शेतकर्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
Comments