नगर जिल्ह्यातील या तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
संगमनेर । वीरभूमी- 25-Mar, 2021, 12:00 AM
कोविडशी लढा देत असतांना गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील काही गावांमध्ये अचानक जमीन थरथरु लागल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.
घारगाव, बोटा, माळवाडी व कुरकुटवाडी या गावात धक्क्यांची तिव्रता अधिक असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले होते. नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेच्या भूकंप मापकावर या धक्क्याची नोंद झाली असून 84 सेकंदाचा हा धक्का 2.6 रिश्टर स्केल मोजला गेला आहे.
संपूर्ण डोंगरी भाग असलेल्या तालुक्यातील पठार भागात गेल्या काही वर्षांपासून जमीनीतून गुढ आवाजासह वारंवार जमीनीला हादरे बसण्याचे प्रकार समोर आले आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास घारगाव, बोटा, माळवाडी व कुरकुटवाडी या परिसरातील बहुतेक संपूर्ण भागाला सुमारे दिड मिनिटांचे जोरदार धक्के जाणवले.
अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागल्याने भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पळाले. आसपासच्या सगळ्यांनाच असा अनुभव आल्याने सदरचा धक्का भूकंपाचाच असल्याची चर्चा सुरु झाली.
याबाबत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेकडून काही वेळातच तहसीलदार निकम यांना अहवाल प्राप्त झाला असून वरील भागात दुपारी 4.36 वा.च्या सुमारास जाणवलेले हादरे भूकंपाचेच होते हे स्पष्ट झाले आहे.
साधारणतः 84 सेकंदापर्यंत हा प्रकार सुरु होता. या ठिकाणांपासून 76 किलो मीटर अंतरावर असलेल्या मेरीच्या भूकंप मापक यंत्राने या धक्क्याची नोंद 2.6 रिश्टर स्केल इतकी केली आहे.
भूगर्भीय बदलांमुळे सदरचे धक्के जाणवले असून त्याची तिव्रता अत्यंत कमी होती. त्यामुळे त्यातून कोणतेही नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरुन जावू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
कोविडचा धोका कायम असतांनाच आता भूकंप सदृश्य धक्के बसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
Comments