नियम मोडणार्या दुकानदारांवर तहसीलदारांची दंडात्मक कारवाई
शेवगाव । वीरभूमी- 29-Jul, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात व तालुक्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी शेवगाव तालुका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नियमाचे उल्लंघन करणार्या नागरिकांसह व्यावसायिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात येत आहे.
बुधवारी तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या पथकाने निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणार्या सहा दुकानाच्या मालकांसह मास्क न घातलेल्या 7 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. व्यावसायिक व नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे.
मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. शेवगाव तालुक्यातही आकडेवारीचे प्रमाण कासवगतीने वाढत आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात ठेवण्यासाठी तालुका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी पोलिस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासन यांच्या मदतीने शेवगाव शहरात नियम मोडणार्यांवर बुधवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणार्या सहा दुकान मालकांवर कारवाई करत तीन हजार रुपयाचा दंड वसूल केला. तर शहरात विनामास्क फिरणार्या 7 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत 1400 रुपयाचा दंड वसूल केला आहे.
तालुका प्रशासनाने आतापर्यंत मास्क न घालणार्या 4 हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच नियम मोडणारी मंगल कार्यालये, लॉन्स, दुकाने, हॉटेल व्यावसायिक, खाजगी अस्थापने यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत दंड वसूल केला आहे.
यापुढे नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित तोंडाला मास्क लावावा. व्यावसायिकांनी आपली दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारीत वेळेतच उघडी ठेवावी, अन्यथा दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिला आहे.
omEDiCWNYMBURk