विजय उंडे । श्रीगोंदा- 07-Aug, 2021, 12:00 AM
अवैध वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने चालविलेले गोमांस बेलवंडी पोलिसांनी (Belwandi police) नाकाबंदी दरम्यान पकडले. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात (Detained two accused) घेऊन त्यांच्याकडून 1 लाख 65 हजारांचे 550 किलो गोमांस व कार हस्तगत (Beef and car seized) केली आहे. आरोपींना अटक करून त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हयात दि. 6 ऑगस्ट रोजी नाकाबंदी व शोध मोहीमेत पोलीस रेकॉर्डवरील फरारी व अट्टल आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविली.
या दरम्यान बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे हे अवैध धंद्याची माहिती घेत असताना गुप्त माहिती मिळाली की, अहमदनगर- पुणे रस्त्यावरून गोमांस घेऊन एक कार पुण्याकडे चालली आहे. खबर मिळताच पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, मुख्य पोलीस हवालदार हसन शेख, ज्ञानेश्वर पठारे, कोळपे, बारवकर, संतोष गोमसाळे, शिपनकर यांच्या पथकाने अहमदनगर- पुणे मुख्य रस्त्यावर गव्हाणेवाडी येथे रात्री 1 वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली.
महिंद्रा कंपनीची मांझा कार (क्र. एमएच. सी.आर. 4166) व 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 550 किलो गोमांससह आरोपी चालक योगेश रोहीदास गोरडे (रा. सावरगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) व रोशन मधुकर गुरसाळे (रा. जामरुंग रोड, जामरुग जबुग अबिवळी, जि.रायगड) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
याबाबत पोलीस हवालदार संतोष गोमसाळे यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पठारे हे करीत आहे.
त्याचदिवशी शोध मोहीम चालू असताना रात्री 3 वाजेच्या दरम्यान बेलवंडी पोलीस ठाण्यात विविध गुन्हयातील फरारी आरोपी चंद्रकांत भाऊसाहेब घावटे (रा. शेळकेवाडी, राजापूर, ता. श्रीगोंदा) यास पकडण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे हे करत आहेत.
याच कालावधीत बेलवंडी पोलिसांनी साथ प्रतिबंधात्मक कायद्यानुसार विना मास्क फिरत असलेल्या नागरिकांवर केलेल्या कारवाईत 21 जणांकडून 39 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
krZuIfHsdnoDAJx