शेवगाव । वीरभूमी- 13-Aug, 2021, 12:00 AM
शहरात दुचाकी वाहनांच्या चोर्यांमध्ये वाढ झाली असतांनाच काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चक्क चारचाकी (तवेरा गाडी) वाहनाची चोरी केली. दुचाकीसह चारचाकी वाहनांची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले असून शेवगाव शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अरुणा विजयकुमार शहाणे (वय 34, रा. समर्थनगर पाथर्डी रोड, शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची तवेरा गाडी चोरी प्रकरणी एका अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव शहरातील समर्थनगर येथे आमचे सायकल दुकान असून त्याद्वारे आमचा उदरनिर्वाह चालतो. घरामध्ये आम्ही पती, मुलगा, सुन व दोन नातांसह राहतो. दैनंदिन कामासाठी 2016 मध्ये तवेरा एमएच16, बीएच 5638 हे चारचाकी वाहन घेतले होते.
बुधवार दि. 11 रोजी त्याच गाडीमध्ये घरातील सर्वजण बीड येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी सर्वजन गेलो होतो. त्याच दिवशी रात्री 11 वाजता पुन्हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर आम्ही घरी आलो. गाडी घरासमोर लॉक करून व्यवस्थित पार्कीग केली होती. मात्र सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे उठले असता घरासमोर लावलेली तवेरा गाडी गायब झाल्याचे निदर्शनास आले.
गाडी पार्कींग केल्याच्या ठिकाणी काचांचा खच पडलेला दिसून आला. इतरत्र शोधाशोध केली मात्र गाडी आढळून आली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात येवून सविस्तर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची तवेरा गाडी चोरी प्रकरणी एका अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान शेवगाव शहरासह तालुक्यात दुचाकी चोरी, घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे चोरी करतांना मारहाण करत असल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच आता चोरट्यांनी चारचाकी वाहन चोरण्यास सुरुवात केल्याने वाहन मालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यापूर्वी ठाणे येथून चोरुन आणलेली बस शेवगाव येथील नेवासा रोडवर सापडली होती. मात्र अद्यापही त्याचा तपास गुलदस्त्यातच आहे. तर अनेकांच्या दुचाकी व चारकचाकी वाहनांची आतापर्यंत चोरी झालेली आहे. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवूनही त्याचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
शेवगाव शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून वाहन मालकांना आर्थिक नुकसान होत आहे. तरी अशा घटनांचा पोलिसांनी तपास लावून नागरिकांना दिलासा द्यावा व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
DEXvTdwKePuqYQg