आम्ही त्यांचेच (भाजपाचेच) अनुकरण करत आहोत
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पाथर्डी येथे कबुली
पाथर्डी । वीरभूमी- 14-Aug, 2021, 12:00 AM
विकासकामांसाठी दिला जाणार्या निधीमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा विरोधी आमदारांकडून आरोप केला जातो, याबाबत आपले मत काय? असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ‘आम्ही त्यांचेच (भाजपाचे) अनुकरण करत आहोत. त्यात वेगळे ते काय? अशी कबुली पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाथर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या विधानावरून राज्यातील विरोधी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघाच्या विकासाचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे. त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याऐवजी त्याच चुका पुन्हा करून आघाडी सरकार काय साध्य करत आहे? असा सवाल सत्ताधार्यांना विचारला जात आहे.
शनिवारी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथील संस्कार भवन येथे कोरोनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्यासह इतर अधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेवढे रुग्ण होते, दुसर्या लाटेत हीच रुग्ण संख्या दुप्पट झाली. आता तज्ञांच्या मते आगामी काळात तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यावेळी रुग्ण संख्या चौपट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी तिसर्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून अहमदनगर जिल्ह्यातील आर्ध्या भागाची जबाबदारी शिर्डी संस्थानने घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयाशी मार्गदर्शन मागविले आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मीतीवर भर दिला असून आगामी काळात अहमनगर जिल्हा स्वयंपूर्ण झाला असेल. मागील काळात आपण जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजनचे टँकर इतर जिल्ह्याने पळविल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र यापुढे ऑक्सिजन बाबत जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे. उद्या दि. 15 ऑगस्ट पासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले असून व्यावसायिकांना रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुकानदार व व्यावसायिक यांनी दुकानातील कर्मचार्यांची कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेले आवश्यक आहे.
यावर या दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी काही नियोजन केले आहे का? असे विचारले असता पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्राकडून मिळणार्या लसीपैकी 25 टक्के लसी या खाजगी रुग्णालयांना दिल्या जातात. यामुळे व्यावसायिकांनी विकतच्या लसी घेऊन आपल्या कामगार व कर्मचार्यांचे लसीकरण पुर्ण करून घ्यावे, असा सल्ला दिला.
विकासकामानसाठी निधी देण्यात सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप विरोधी आमदारांकडून केला जातो, यामध्ये किती तथ्थ आहे? असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही त्यांचेच अनुकरण करत आहोत. असे म्हणत विरोधी पक्षांच्या आमदारांचे आरोप खरे असल्याची जाहीर संमती दिली. यामुळे विरोधी आमदारांच्या मतदारसंघातील विकासाचा प्रश्न आता यानिमित्त पुढे येत आहे.
जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, शेवगाव आदी भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या तालुक्यात मागील काही काळात विवाह सोहळे व इतर भागातून येणार्यांची संख्या जास्त होती. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला होता. मात्र या तालुक्यांनी स्वंयपुर्तीने 14 दिवाचा बंद पाळल्याने कोरोना संसर्ग कमी झाला असल्याचे सांगितले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरने जुलै महिण्यात वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना जुलै महिण्यात घडली होती. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही? याबाबत विचारले असता पोलिस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले, या प्रकरणातील सर्वजन हे शासकीय नोकर असल्याने कामकाजाशी निगडीत आहेत. यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी कलम 256 नुसार वरीष्ठ पातळीवर याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करता योतो. या प्रकरणात सर्व जाबजबाब वरीष्ठांना पाठविण्यात आले असून वरीष्ठांचे अहवाल आल्यानंतर कारवाई होईल. असे सांगितले.
Tags :
HjabFDgXqGfPE