अगोदर त्या गैरकारभारामागचे स्पष्टीकरण द्या, मग आमचे ज्ञान काढा
शिवशंकर राजळे व बंडू बोरुडे यांचा घणाघात । राजळे विरुद्ध राजळे संघर्षाची ठिणगी
पाथर्डी । वीरभूमी- 18-Aug, 2021, 12:00 AM
औरंगाबाद येथील मर्जीतील ठेकेदाराला शहर स्वच्छतेचा ठेका तब्बल 1 कोटी 79 लाख रुपयाला देण्यामागचे नेमके गौडबंगाल काय. गेली अनेक वर्ष पालिकेच्या मालकीचा जेसीबी गायब असून भाडोत्री जेसीबी लावून लाखो रुपये नेमके कोणाच्या घशात घातले आहेत, याचे स्पष्टीकरण जनतेला द्यावे व नंतर आमचे ज्ञान काढावे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे व नगरसेवक बंडू बोरुडे यांनी आमदार राजळे व नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांचे नाव न घेता केला आहे.तालुक्याच्या राजकारणात राजळे विरुद्ध राजळे अशी संघर्षाची ठिणगी आता तालुक्यातील राजकीय वातावरण पेटवणारी ठरत आहे. याबाबत पक्षातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या निवेदनावर नगरसेवक बंडू बोरुडे, माधुरी आंधळे, सविता भापकर, संगीता डोमकावळे, माजी तालुकाध्यक्ष दिगंबर गाडे, चाँद मणियार, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे, उपसभापती मंगल गर्जे, संचालक वैभव दहिफळे, बाळासाहेब घुले, शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार आदींच्या सह्या आहेत.
बाजार समितीचे भूखंड विकल्याचा आरोप करणार्यांनी भूतकाळात डोकावून पहावे. 74 भूखंडा पैकी केवळ 6 भूखंडाचे वाटप विद्यमान संचालक मंडळाच्या काळात झाले आहे. उर्वरित मागील भूखंड वाटपाच्या भूखंडाचे श्रीखंड कोणी खाल्ले हा खरोखरच चौकशीचा प्रश्न आहे. भगवानगड व परिसराच्या पाणी योजनेचे पितळ उघडे पडल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न आमदार मतदारसंघात फिरून करीत आहेत.
पालिकेचा गैरकारभार व बाजार समितीच्या मागील सोळा वर्षाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री यांना भेटून करणार असून त्या चौकशीतून जे निष्पन्न होईल ते स्वीकारण्याची हिम्मत तुम्ही दाखवा. भगवानगड व 35 गावांच्या पाणीयोजनेचे गाजर दाखवून आमदारांनी त्या भागातील लोकांची फसवणूक केली. निवडणूक होती म्हणून लोकांना भावनिक केले. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमदारांनी केलेली फसवणूक लोकांच्या लक्षात आली. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी ऐनवेळी भावनिक वातावरण करण्याची तुमची पद्धत जुनीच आहे. हा प्रकार पुन्हा एकदा जनतेच्या लक्षात येताच आमच्यावर टीका करण्याचा उद्योग तुम्ही सुरू केला आहे.
नगरपालिकेचा कारभार कसा आहे याची माहिती शहरातील जनतेला आम्ही सांगण्याची गरज नाही. अलिबाबा आणि चाळीस चोर अशी अवस्था या संस्थेची झाली आहे. गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क मध्ये लॉन टाकण्यासाठी ठेकेदारास तब्बल साठ लाख रुपये अदा करण्यात आले. परंतु त्यातील गवताची एक काडी ही तेथे नाही.
पार्कचे उतार्यावर जेवढे क्षेत्र आहे. त्यापेक्षा कमी जागेत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. उर्वरित जागेसाठी कोणी आर्थिक तडजोड केली. याचे उत्तर शहरातील जनतेला हवे आहे. पालिकेचा स्वच्छतेचा ठेकेदार पालिकेची साधन सामुग्री वापरतो, तरीही दर महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा कुणाकडे जातो.
शहरात दीड कोटीचे एलईडी लाईट बसविल्याचे सांगितल्या जाते. ते कुठे व त्यातील किती चालू स्थितीत आहेत हे दाखवा. 14 नगरसेवकांपैकी किती जण ठेकेदारी करतात, याचेही उत्तर नागरिकांना हवे आहे. नगरसेवकांच्या आर्थिक सोयीसाठी आराखडे तयार केले जातात. जनतेच्या सेवेसाठी नाही. यातुन सब मिल बाटके खाओ अशी प्रवृत्ती फोफावत आहे.
शहरातील सीसीटीव्हीची अवस्था त्यांना दिसत नाही का? पाच वर्षांत भ्रष्टाचारा शिवाय साधी मुतारी न बांधणार्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारु नये. विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासह घेऊन उपमुख्यमंत्री, नगरविकासमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे राजळे व बोरुडे यांनी सांगितले.
Tags :
dWmQphfLiyTux