राजेंद्र नागवडे यांना सहकारी कारखाना चालविण्याचे ज्ञान नाही
केशवराव मगर । पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप
श्रीगोंदा । वीरभूमी - 24-Aug, 2021, 12:00 AM
‘नागवडे’ सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी परभणी (parbhani) व कराड (karad) येथे स्वतःचे दोन खासगी कारखाने (factory) काढले असून बहुतांश त्यांचा वेळ खाजगी कारखान्याकडे असल्याने सभासद व कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आणली आहे. बापूंना कारखाना चालविण्याचे संपूर्ण कसब होते. मात्र त्यांच्या चिरंजीवांना सहकारी कारखाना चालवण्याचे ज्ञान नसल्याची घणाघाती टीका नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर (keshav magar) यांनी श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.यावेळी मगर म्हणाले की, नागवडे हे आमची दिलजमाई झाल्याचे सांगत असले तरी या गोष्टीत अजिबात तथ्य नाही. सभासद, शेतकरी व कामगारांचे आम्ही प्रपंच मोडू देणार नाही. बापू, खासेराव वाबळे, शिवराम अण्णा, रंगनाथ पंधरकर, संपतराव जामदार यांनी शेतकर्यांचे शेअर्स गोळा करून तालुक्याची कामधेनू उभारून कारखाना उभारला. त्यांच्या तत्वांचा वारसा पुढे चालू राहण्यासाठी ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढवणारच, असे मगर यांनी स्पष्ट केले.
तसेच 2019-20 मध्ये ऊस शिल्लक असतानाही नागवडे यांनी कारखाना बंद ठेवून 28 ते 30 कोटींचे नुकसान केले. कारखाना बंद असताना कामगारांना अर्धा पगार देऊन काम मात्र स्वतःच्या खासगी कारखान्यात करायला लावले. डिस्टलरी, रॉ शुगर, को-जन प्रकल्प, सभासद साखर विक्री या गोष्टी व अनेक नियमबाह्य कामे करून कारखान्याला कोट्यावधी रुपयांचा दंड व कोट्यावधी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करून कारखाना अडचणीत आणण्याचे काम केले असल्याचा आरोप करून पक्षविरहीत आघाडी स्थापन करून नागवडे कारखाना निवडणूक लढण्याचा निर्धार मगर यांनी व्यक्त केला.
कारखान्याचे संचालक आण्णासाहेब शेलार यांनी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, आमचे आरोप जर बिनबुडाचे असतील तर राजेंद्र नागवडेंनी बापूंच्या स्मारकस्थळी येऊन समोरासमोर येऊन खरे खोटे करावे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सुद्धा इतक्या गाड्या-घोड्या, चालक नाहीत पण चेअरमन मात्र कारखान्याच्या खर्चात सहा चालक ठेवतात. कारखाण्याचे डिझेल घरच्या गाड्यांना वापरून डिझेलची पुण्यात नेऊन विक्री केली जाते. संस्थेच्या शिक्षकांचा राजकारणासाठी वापर करून शिक्षकांचे पगार कापून पुरग्रस्तांना मदत केली आणि नाव मात्र स्वतःच केलं.
आम्ही केशव भाऊंच्या सार्थ निवडीत सभासद हाच आमचा पक्ष असून सत्ता आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोच्च भाव देणार आहोत. बिनविरोध निवडणूक करायची असेल तर केशवभाऊ मगर यांना चेअरमन करा, अन्यथा निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे शेलार यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी मागील काही दिवसांपासून श्रीगोंदा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले व राजेंद्र नागवडे यांच्यात जवळीक दिसल्यानंतर पत्रकारांनी भोसले यांना विविध प्रश्न विचारून घेरले.
मात्र भोसले यांनी सहकार टिकवण्यासाठी भाऊंसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले व कारखाना निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जरी आदेश दिला तरी आपण केशवभाऊ मगर यांच्यासोबत पक्षविरहित आघाडीत राहणार असे काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले. यावर मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला केशवभाऊ मगर, आण्णासाहेब शेलार, काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपक भोसले, पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते, सभापती संजय जामदार, अजित जामदार, अॅड. बाळासाहेब काकडे, जितेंद्र मगर, शांताराम भोईटे, दिगंबर नलगे, डॉ. दत्तात्रय नागवडे, अॅड. बापूसाहेब भोस, नंदकुमार कोकाटे, बाळाप्पा पाचपुते, अभिजित गायकवाड, जितेंद्र मगर आदी उपस्थित होते.
निवडणुकीवेळी सर्वांचा बुरखा फाडू, हे सर्व पोरकटपणाचे आरोप ः राजेंद्र नागवडे
केशवभाऊ मगर व आण्णासाहेब शेलार यांनी केलेल्या आरोपांवर चेअरमन राजेंद्र नागवडे यांना विचारले असता निवडणुका डोळ्यापुढे ठेवुन सर्व आरोप होत आहेत. सर्व आरोप तथ्यहीन, बिनबुडाचे व पोरकटपणाचे असून निवडणुकीवेळी सर्वांचा बुरखा फाडू. कारखान्याचे चेअरमन कुणाला करायचे हे सभासद ठरवतील. संचालक झाल्यापासून जे करखान्याकडे फिरकले सुद्धा नाहीत त्यांनी याबाबत विचार करू, नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Tags :
yIfTxnecAkLGYv