पाथर्डी, खरवंडी कासार । वीरभूमी - 23-Sep, 2021, 12:00 AM
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्यास प्रारंभ झाला असून समान समस्यांना पुढे करत तालुक्याच्या हद्दीवरील उकांडा फाटा येथे एकाच वेळी काही मीटर अंतरावर दोन स्वतंत्र आंदोलने झाली. अधिकार्यांनी दोन्ही नेत्यांना स्वतंत्रपणे उत्तरे दिली.
एका आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते अंकुश कासुळे तर दुसर्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले. कोरोना काळात आंदोलनांना बंदी असतानाही होणार्या आंदोलनामुळे राजकीय हवा तापू लागली आहे.
पैठण- पंढरपूर महामार्ग, खरवंडी कासार- लोहा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, वस्तीचे जोड रस्ते आदी मुद्यांवरून आंदोलने झाली. दोन्ही आंदोलकांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा करत प्राधान्य क्रमाने शेतकर्याच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यात येईल. असे आश्वासन नायब तहसीलदार भाऊसाहेब गुजांळ यांनी दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, यांना नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष पचंनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे नायब तहसीलदार गुंजाळ यांनी सांगीतले. रस्त्याच्या भुसपंदनाचा नुकसान भरपाईचा प्रश्न तीन महिन्यांत मार्गी लावु व इतर कामे प्राधान्याने करू असे आश्वासन खरवंडी-लोहा राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता रमेश परजणे व पैठण-पढंरपुर महामार्गाचे अभियंता अभिषेक फुलावर यांनी दिले.
भालगाव येथील जळालेले रोहीत्र लवकर बदलून देऊ असे आश्वासन वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंता प्रियंका मुंढे यांनी दिले. येत्या काळात दिलेल्या आश्वासनांची वेळेत पुर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दोन्ही गटांनी यावेळी प्रशासनाला दिला.
भालगावचे माजी सरपंच अंकुश कासुळे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब खेडकर, सुरेश खेडकर, सुभाष काळे, उध्दव सुपेकर, जनार्धन सुपेकर, सुदाम खेडकर, अण्णासाहेब ढाकणे, कासळवाडी सेवा सोसायटी चेअरमन बाळासाहेब काकडे, मिडसागंवीचे उपसरपंच विष्णु थोरात, मुगुंसवाडे सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब खेडकर यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले.
तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा भटके विमुक्त युवती प्रदेशाध्यक्ष अॅड. भाग्यश्री ढाकणे, उपसरपंच जगन्नाथ खेडकर, पाडुंरंग खरमाटे, अशोक खरमाटे, अहमदनगर भाजपा अल्पसख्यांक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रशीद तांबोळी, गणेश सुपेकर, तुकाराम खेडकर, गहीनीनाथ खेडकर, संजय बेद्रे, एकनाथ खेडकर, उध्दव खेडकर, बाळराजे खेडकर, किसन रोकडे, विठ्ठल बनसोडे, अंबादास कोरडे यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
एकाच ठिकाणी दोन राजकीय मतभिन्नता असणार्या गटांचे आंदोलन असल्याने पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक प्रवीण पाटील यांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिस्थिती हाताळली.
Comments