शेवगाव । वीरभूमी- 16-Oct, 2021, 12:00 AM
एका महिलेसोबतचा फोटो तयार करून तिच्याशी तुमचे अनैतिक संबध आहेत. अशी बदनामी करू म्हणुन वारंवार पैशाची मागणी होत असल्याने देवटाकळी येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. 16 रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान घडली.
संभाजी साहेबराव खरड (वय 55, रा. देवटाकळी, ता. शेवगाव) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात भाऊराव उर्फ मधुकर पोपट वाघमारे, शरद आण्णा वाघमारे व कैलास रतन वाघमारे (तिघे रा. देवटाकळी, ता. शेवगाव) अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महेश संभाजी खरड (रा. देवटाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील भाऊराव वाघमारे, शरद वाघमारे व कैलास वाघमारे या तिघांनी संभाजी साहेबराव खरड यांचा फोटो एका महिलेच्या फोटोशी जोडून तुमचे या महिलेशी अनैतिक संबध आहेत. तुमची सर्वत्र बदनामी करू असे म्हणत मागील तीन महिण्यापासून त्रास देत सुमारे चार लाख रुपये उकाळले आहेत. आता पैसे दिले आहेत, यापुढे बदनामी करू नका असे सांगितले होते.
मात्र तरीही वरील तिघांनी पंधरा दिवसापुर्वी पुन्हा आठ लाख रुपयांची मागणी करत पैसे दिले नाहीतर बदनामी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही दिवसापुर्वी देवटाकळी ग्रामपंचायतीसमोर संभाजी खरड यांना भाऊराव वाघमारे यांनी लोखंडी गजाने मारहाण केली होती. या मारहाणीत संभाजी खरड यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते.
या तिघांकडून पैशाची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात येत होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून संभाजी खरड यांनी शनिवार दि. 16 रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान संभाजी खरड यांनी घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर संभाजी खरड यांना शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी संभाजी खरड हे मयत झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी वरील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत संभाजी खरड यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी सर्व घटनेचा तपशील घेतल्यानंतर वरील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर दुपारी 4 वाजता मृतदेह ताब्यात घेत सायंकाळी 6 वाजता संभाजी खरड यांच्यावर देवटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सपोनि. शिरीष शेळके हे करत आहेत.
TnBwlRcv