दोघांना अटक । दहा ते 15 जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पाथर्डी । वीरभूमी- 17-Oct, 2021, 12:00 AM
मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला असून या संदर्भात पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींसह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीविरोधात शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मोहटे गावात घडली आहे.
तालुक्यातील मोहटा गावातील हनुमान मंदीरासमोर जिल्हाधिकारी यांच्या कोरोना संबंधाने गर्दी होवू नये याकरीता जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांनी एकत्र येवून मिरवणूक काढली. मिरवणुकीत बँड व इतर वाद्य वाजवून 50 ते 100 लोकांची गर्दी जमवली व ती गर्दी काढण्यासाठी पोलीस गेले असता आरोपी महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे यांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्यांना आम्ही येथून जाणार नाही व कोणालाही जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला कोण आडवणार, असे म्हणून चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्यांना धक्काबुक्की केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहटादेवी गडावरील शारदीय नवरात्र उत्सव संपल्या नंतर मोहटादेवीची मोहटे गाव ते देवीगड अशी मिरवणूक काढण्यात येत असते. त्याप्रमाणे काल रात्री ही मिरवणूक काढण्यास सुरवात झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी पोनि. सुहास चव्हाण, सपोनि. रामेश्वर कायंदे, प्रवीण पाटील हे मोहटादेवी गड पायथ्याला फौजफाटा घेऊन गेले असता त्या ठिकाणी जवळपास 100 जण बँडच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. यामुळे पोनि. चव्हाण यांनी पोलीस गाडीच्या स्पीकर वरून जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याने मोठ्या संख्येने थांबलेल्या लोकांनी निघून जावे. तसेच करोना नियमाचे पालन करावे. असे आवाहन केले.
यावेळी त्या ठिकाणी या घटनेतील आरोपी महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे यांनी चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्यांना आम्ही येथून जाणार नाही व कोणालाही जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला कोण आडवणार. असे म्हणून चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्यांशी झटापट केली.
यावेळी पोलिसांनी महादेव दहिफळे यास पकडून ठेवले. मात्र घटनास्थळी जमलेल्या इतर दहा ते पंधरा व्यक्तीने विठ्ठल दहिफळे यास पळून जाण्यास मदत केल्याने तो पळून गेला. यानंतर चव्हाण यांनी महादेव दहिफळे व विठ्ठल दहिफळे यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या दहा ते पंधरा जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच कोविडच्या नियमांचे पालन न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी महादेव दहिफळे याला अटक केली आहे. या घटनेचा तपास सपोनि. प्रवीण पाटील हे करत आहेत.
Comments