उपचार सुरू असतांना त्या बालिकेचा मृत्यू
अकोले । वीरभूमी - 21-Oct, 2021, 12:00 AM
अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने एका दीड वर्षीय बालिकेवर हल्ला करत जबड्यात धरून उचलून नेले होते. बिबट्याने बालिकेला उचलल्याचे पाहिल्यानंतर तिच्या कुटुंबाने बिबट्याचा पाठलाग केला होता. यामुळे बिबट्याने बालिका सोडून देत पळ काढला होता.
या घटनेत जखमी झालेल्या बालिकेवर उपचार सुरू होते. मात्र बिबट्याने गळ्यावरच हल्ला केला असल्याने आज गुरुवारी उपचार सुरू असतांना या बालिकेचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे नाव माई जनक वैद्य (वय दीड वर्षे) असे आहे.
सुगाव खुर्द गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुखदेव भिकाजी वैद्य यांचे घर आहे. त्यांची नात माई वैद्य ही मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. त्याचदरम्यान बाजूच्या उसातून अचानक आलेल्या बिबट्याने या बालिकेवर झडप घालून तिला जबड्यात पकडले व तिला घेऊन गेला.
हे दृश्य पाहून तेथे असलेल्या तिच्या बहिणीने आरडाओरडा सुरू केला. तिचे आजोबा व घरातील लोक बिबट्याच्या मागे पळाले. त्यामुळे बिबट्याने मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला. घरापासून सुमारे 100 फुट बिबट्या या मुलीला घेऊन गेला होता.
या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या व जखमी झालेल्या या बलिकेच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिला तातडीने अकोले येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गळ्या भोवती बिबट्याच्या दातामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या. एकूण 25 टाके पडले होते.
उपचार सुरू असतांना तिच्या प्रकृत्तीत सुधारणा होत होती. मात्र आज गुरुवारी सकाळी तिची प्रकृत्ती खालावली व उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. या घटनेने वैद्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
SKFpaoOJDRHLAPC