माहिती अधिकारात मागीतलेली माहिती दिली नाही म्हणुन ग्रामसेवकाला 10 हजारांचा दंड
पाथर्डी । वीरभूमी- 29-Oct, 2021, 03:15 PM
पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी माहिती अधिकारात मागीतलेली माहिती दिली नाही म्हणुन 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. हा आदेश राज्य माहिती आयुक्त, नाशिक यांनी दिला आहे.
पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी येथील नारायण नवनाथ साबळे यांनी दि. 2/7/2021 रोजी माहिती अधिकारात अर्ज करून दि. 31/7/2017 व दि. 2/0/7/2018 या कालावधीतील ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मिळणेबाबत अर्ज केला होता. त्या अर्जावर काय चर्चा व ठराव घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यसुची इतिवृत्तामध्ये काय नोंद करण्यात आली, याबाबतची माहिती जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, धायतडकवाडी यांचेकडे मागितली होती.
मात्र माहिती अधिकारी बी. के. तिडके यांनी माहिती अर्जाला अनुसरुन विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलाच्या निर्णयानंतरही माहिती दिली नाही. म्हणुन नारायण साबळे यांनी राज्य माहिती आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपिल केले होते. या अपिलानंतर जन माहिती अधिकारी ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी दि. 16/8/2017 रोजीची ग्रामसभेची प्रत सादर करीत असल्याचे सांगत हा खुलासा मान्य करून शास्तीची कारवाई करण्यात येऊ नये म्हणुन विनंती करत ग्रामसेभेची प्रत व माहिती पाठविली होती.
मात्र राज्य माहिती आयुक्त, नाशिक यांनी जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी अपिलार्थीस त्यांच्या माहिती अर्जास अनुसरुन विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलाच्या निर्णयाला अनुसरुन देखील माहिती पुरविलेली नाही. यावरून तत्कालीन जन माहिती अधिकारी यांनी अपिलार्थीस माहिती देण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होते. यामुळे माहिती आयुक्त यांनी ग्रामसेवक बी. के. तिडके यांचा खुलासा अमान्य करत शास्तीची कारवाई केली.
यावरुन माहिती आयुक्त यांनी तत्कालीन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी अपिलार्थी यांना विहित नमुन्यात व वेळेत माहिती दिली नाही म्हणुन माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 चे कलम 20 (1) अन्वये 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही दंडाची रक्कम जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक बी. के. तिडके यांच्या पगारातून मासिक दोन हप्प्यात कपात करण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे. हे आदेश नाशिक विभागीय माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी दिले आहेत.
MSdvnKZawkhoLU