अहमदनगर । वीरभूमी- 06-Nov, 2021, 02:26 PM
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून तब्बल 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तब्बल 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी घडली.
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षतामधील मृतामध्ये शेवगाव, नेवासा, पारनेर, नगर, संगमनेर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कोरोना बाधित आसलेल्या एकुण 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. या सर्व रुग्णांवर उपचार सुरु असतांना शनिवार दि. 6 रोजी सकाळी शॉर्टसर्किटने अतिदक्षता विभागाला आग लागली.
या आगीमध्ये सीताराम दगडू जाधव (रा. बक्तरपूर, ता. शेवगाव), भिवाजी सदाशिव पवार (रा. किन्ही, ता. पारनेर), रामकिसन विठ्ठल हरपुडे (रा. माका, ता. नेवासा), कोंडाबाई मधुकर कदम (रा. केडगाव, ता. नगर), छबाबी अहमद सय्यद (रा. शेंडी, ता. नगर), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (रा. तेलकुडगाव, ता. नेवासा), कडूबाळ गंगाधर खाटीक (रा. पाथरवाला, ता. नेवासा), आसराबाई गोविंद नांगरे (रा. शेवगाव), दीपक विश्वनाथ जगदाळे (रा. आश्वी, ता. संगमनेर) व एका अनोळखी रुग्णाचा समावेश आहे.
या घटनेमध्ये जखमी असलेल्या रुग्णांमध्ये लक्ष्मण थोरात (रा. पाथर्डी), रंभाबाई पंजाराम विधाते (रा. बाभुळवेढा, ता. नेवासा), गोदाबाई पोपट ससाणे (रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा), यमुना तात्याराम कांबळे (रा. केडगाव, ता. नगर), लक्ष्मण आसराजी सावळकर (रा. बोधेगाव, ता. शेवगाव), संतोष धर्माजी ठोकळ (रा. हनुमानवाडी, जि. बीड), अंकुश किसन पवार (रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी) अशी आहेत.
आग लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी जीवाची पर्वा न करता अतिदक्षता विभागातील रुग्णांना बाहेर काढले. घटनेची माहिती समजताच महानगर पालिकेच्या, एमआयडीसी आणि लष्कराच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
अतिदक्षता विभागातील रुग्णांना इतर कक्षात दाखल करण्यात आले. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध राजकीय पदाधिकार्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेत तब्बल 10 जणांचा होरपळू मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभिर जखमी झाले.
Comments