अवकाळी नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्या
माजी आ. वैभवराव पिचड । भाजपाचे तहसीलदारांना निवेदन
अकोले । वीरभूमी- 02-Dec, 2021, 08:48 PM
गेल्या दोन-तीन दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या अकोले तालुक्यातील सर्वच भागातील भात व शेती पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत करावी. शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला.अकोले तालुक्यात आदिवासी भागासह सर्वच भागात गेली दोन ते तीन दिवसापासून तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवकाळी पावसाने तालुक्यात सर्व भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे व भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आदिवासी भागात मुख्य पीक असलेले भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इतर भागात कांदा पीक, टोमॅटो, गहू, हरभरा, मका यासह आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.
शेतीमालाला भाव नाही त्यामुळे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असताना तालुक्याचे लोक प्रतिनिधी झोपले की झोपेचे सोंग घेतात. प्रशासन ही सुस्त झाले आहे, अशी टीका वैभव पिचड यांनी केली.
सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या आदिवासी दुर्गम भागात भात कापणी सुरू आहे. मात्र अकोले तालुक्यासह वरच्या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील कापलेली भात पिक तसेच शेतात उभी असलेली भात पिके पूर्णपणे वाया गेली आहे. अवकाळी पाऊस झाल्याने तातडीने या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे होणे गरजेचे होते. ते न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय वीज वितरण कंपनीने वीज बिले सक्तीने वसुली चालू केली आहे. तसेच वीजपुरवठा वेळीअवेळी दिला जात आहे. वीजपुरवठा खंडित केला जात आहे. डीपी चे कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे अजून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.
तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास व शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे न थांबविल्यास मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकर्यांना एकत्र करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार यांना शेतकर्यांच्या वतीने भाजपच्या नेते व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जि. प. सदस्य कैलास राव वाकचौरे, जि. प. माजी उपसभापती सीताराम देशमुख, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अॅड. वसंतराव मनकर, यशवंतराव आभाळे, भाजप जिल्हा महिला अध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, राजू पाटील देशमुख, युवामोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, अरुण शेळके, राजेंद्र गवांदे, कल्पनाताई सुरपुरीया, सीताबाई गोंदके, अर्जुन गावडे, अशोक आवारी, राधाकृष्ण आवारी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी रिलायन्स कंपनीला धारेवर धरले होते. आता मात्र ते मुख्यमंत्री असूनही शेतकर्यांना न्याय देत नाहीत. शेतकर्यांना दोन वर्षात एकही रुपयाची मदत केली नाही, याचा खेद वाटतो, असे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले.
Tags :
AkVZCYzWjrJfOE