विश्रामगृहावर विचार मंथन बैठक
पाथर्डी । वीरभूमी- 19-Dec, 2021, 02:32 PM
आगामी वर्षात तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था सह बहुतांश निवडणुका होणार आहेत. त्यांची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून चालू आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात जोरदार राजकीय वारे वाहत आहेत.
याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी पाथर्डी तालुक्याच्या वतीनेही शासकीय विश्रामगृह येथे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार मंथन करण्यासाठी व शहर पदाधिकारी निवडीसाठी बैठक आयोजीत करण्यात आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरु म्हस्के, प्यारेलाल शेख, सोपान भिंगारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडाची राजकीय घोडदौड चालू आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विजयात वंचितची भुमिका महत्वाची राहीली आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत सुध्दा पस्तीस जागेवर वंचीतचे उमेदवारांनी दोन नंबरची मते मिळवली व काही ठिकाणी आपला निसटता पराभव होऊन लक्षनीय कामगिरीने व दोन नंबरवर स्थान पटकावुन प्रस्थापितांना हादरे देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सामान्य जनतेने वंचितला स्विकारले आहे.
आगामी येणार्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीनिशी लढणार आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागुन सत्ताधारी बनायचंय ही खुणगाठ मनाशी बांधायची आहे.
पाथर्डी शहरातील नविन पदाधिकार्याच्या निवडी करण्यात येऊन शहराध्यक्षपदी सनी दिनकर, उपाध्यक्षपदी किशोर फतपुरे व अंबादास पालवे यांची निवड जाहीर करून त्यांचा सत्कार प्रा. किसन चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी म्हस्के, बोदर्डे यांनीही मार्गदर्शन केले.
या बैठकीसाठी शहरातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केले तर महेश पवार यांनी आभार मानले.
Comments