कोविड साथरोग नष्ट होऊन सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
पाथर्डी । वीरभूमी - 18-Jan, 2022, 10:45 AM
श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथे देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता देवीस महाभिषेक, होम हवन, कुमारिका पूजन, पूर्णाहुती करून संपन्न झाली. या नवरात्रोत्सवात काळात राज्याच्या विविध भागातील भाविक दर्शनासाठी आले होते. महापूजा देवस्थानचे विश्वस्त अशोक विक्रमराव दहिफळे व विजया दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आली.
कोविड साथरोग नष्ट होऊन सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच अन्नधान्य, फुलं, फळं याच्या विपुलतेकरिता शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त देवीस प्रार्थना करण्यात आली.
मोहटा देवस्थानात वासंतिक, शारदीय व शाकंभरी असे तीन नवरात्र उत्सव वर्षभरात साजरे होतात. पर्यावरण व निसर्ग महात्म्याच्या दृष्टीने सुद्धा शाकंभरी नवरात्र उत्सवाला महत्त्व आहे. अन्नपूर्णा देवीची व सर्व दुःख हरण करणार्या शक्तिच्या रुपात देवीची पुजा केली जाते. देवस्थान समितीने विविध फुले, फळे, शाक म्हणजे भाजीपाला, मिठाई अशा स्वरुपात देवीची दैनंदिन पुजा बांधून सायंकाळी भाविकांना प्रसाद स्वरुपात वाटप केले.
यानिमित्त ऋतू फळं व भाज्यांची मनमोहक सजावट मंचर येथील भाविक बाळासाहेब थोरात यांनी केली.
बीड येथील वेद शास्त्र संपन्न नारायण देवा सुलाखे खोकरमोहकर, देवस्थानचे पुजारी राजुदेवा मुळे, बाळासाहेब क्षीरसागर, तसेच रविदेवा जोशी, भगवान जोशी, वैभव जोशी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त अॅड. विजयकुमार वेलदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते.
Comments