पंजाब डख । काही भागात ढगाळ वातावरण, तापमानातही वाढ होण्याचा अंदाज
अहमदनगर । वीरभूमी - 19-Apr, 2022, 09:00 AM
राज्यातील काही जिल्ह्यात दि. 22 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान तुरळक पाऊस पडणार आहे. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहुन उष्णतेचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी या आठवड्याचा अंदाज वर्तविला असून यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यात दि. 22 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यासह कोकणपट्टी भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
तर राज्यातील इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच राज्यातील तापमान 38 अंश ते 45 अंश पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे राज्यात या आठवड्यातही उष्णतेचा पारा चढताच राहणार असल्याचा अनदाज व्यक्त केला आहे.
ज्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला त्या भागातील शेतकर्यांनी आपल्या कांदा, हळद, मका, हरभरा, ज्वारी, द्राक्ष, टरबूज आदी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.
तसेच वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येकाने स्वतःची व लहान मुलांची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
Comments