नेत्यांनाच उमेदवार्या; कार्यकर्त्यांनो उचला सतरंज्या
प्राथमिक शिक्षक बँकेच्या वर्तुळात गॉडफादर असलेल्यांचीच चलती
अहमदनगर । वीरभूमी - 13-Jul, 2022, 01:43 PM
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व विकास मंडळाच्या निवडणुकीत नेत्यांनी किंवा त्यांच्या पंटरांनी व नातेवाईकांनी उमेदवार्या पटकावल्या आहेत. त्यामुळे शिक्षकी राजकारणातही गॉडफादर असल्याशिवाय काही खरं नाही हेच दिसून आले.यातून सर्वच मंडळात नाराजी व रुसवेफुगवे सुरू आहेत. कदाचित यातील बहुतेक जण शांत होतीलही पण ज्या नेत्यांना व त्यांच्या बगलबच्चे यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरीची भाषा सुरू केली असून काहींनी राजीनाम्याची तलवार बाहेर काढली आहे. ज्या मंडळाच्या जीवावर आपण मोठे झालो पद भोगली त्याच मंडळाला लोभातून क्षणात सोडचिठ्ठी दिली जात आहे.
माघारीच्या शेवटच्या क्षणी उमेदवार्या कुणाला मिळणार हे समजत पण त्याआधी काही तास त्या मिळवण्यासाठी जी कसरत, डावपेच आखले जातात ते प्रचलित राजकारणाला लाजविणारे असतात. स्वतःला, त्याच्या पत्नीला वा पंटरला उमेदवारी मिळणार नाही असे लक्षात आले की तो नेता रडतो, भांडतो अन क्षणात मंडळ सोडून जाण्याची पण भाषा करतो. ऐनवेळी नेता फुटला असे संकेत जायला नको म्हणून कोअर कमिटी या नेत्यांच्या दबावाला बळी पडते.
नेता जेंव्हा आपल्या पंटर साठी आग्रह धरतो तेंव्हा त्यात बहुतेक वेळा आर्थिक सेटलमेंट झालेली असते. सदर इच्छुक उमेदवाराने या नेत्याची चांगलीच बडदास्त ठेवलेली असते. त्या मिठाला जागत नेता मग मंडळाला ब्लॅकमेल करतो व आपल्या मनासारखी उमेदवारी बसवून घेतो त्यामुळे ज्यांनी मंडळासाठी खस्ता खाल्ल्या ते बिचारे प्रामाणिक कार्यकर्ते आयुष्यभर संतरंज्या उचलत राहतात. ते नाराज झाले तरी त्यांना निष्ठतेचे धडे देवून शांतही बसवले जाते. त्यामुळे शिक्षकी राजकारणात एक तर तुम्ही बडे नेते असायला हवे वा नेत्याचे नातेवाईक अगर पंटर असायला हवे.तुम्हाला असा गॉडफादर नसेल तर मग तुम्ही फक्त नशीबवान असाल तरच तुमची लॉटरी लागू शकते अन्यथा जन्मभर सतरंज्या उचलण्याची भूमिका तुम्हाला इमानेइतबारे करावीच लागणार!
अन हे ठराविक एकाच मंडळात नव्हे तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चारही पॅनल मध्ये हेच घडलेले आहे. चारही पॅनलच्या उमेदवारांच्या याद्यावर नजर टाकल्यास हेच चित्र समोर येते. अनेकांना एक, दोन नव्हे तीन-तीन, चार-चार वेळा लढण्याचा मोह झालेला आहे. काही जण संचालक व बँकेतील पद भोगूनही पुन्हा निवदावर टपलेले आहेत! विकास मंडळही याला अपवाद नाही.
जसे बँकेत पद भोगलेले परत निवडणूक रिंगणात आहेत तसेच विकास मंडळात पद भोगलेले परत बँकेच्या तिकिटावर वेटोळे घालून बसलेत. तर काहींची बँकेतील हौस भागली नाही असे काही आता विकास मंडळावर डोळा ठेवून रिंगणात उतरलेत. अनेकांनी आपण नाही तर आपल्या पत्नीच्या माध्यमातून उमेदवारी करत सत्तेची गाजर खायची तजवीज करून ठेवली आहे.
चौदाही तालुक्यात अन चारही पॅनलमध्ये धुसफूस
जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात व निवडणूक रिंगणात असलेल्या चारही मंडळात उमेदवारी व युत्या-आघाड्यावरून धुसफूस सुरू आहे. याला कोणताच तालुका व कोणतंच मंडळ अपवाद नाही. यातील काही नाराज्या दूर झाल्यात काही दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंडोबांना थंड केले जात आहे. तसेच ज्यांच्या सोबत युत्या-आघाड्या होतील अन मग आपल्याला निवडून येणे सोपे जाईल असे मनात मांडे खाणार्याना मनासारखी युती-आघाडी न झालेल्यांनी रणछोडदास बनत निवडणुकीतुन माघार घेतली आहे.
रडले, भांडले, ब्लॅकमेलही केले!
आपण स्वतः नाहीतर आपला नातेवाईक वा पत्नी अन मग पंटर या क्रमाने उमेदवार्या मिळवल्या गेल्या. मग त्यासाठी काहींनी रडण्याचे नाटक केले. काहींनी नेहमीप्रमाणे अक्राळसतेपणा करत भांडण केली तरी उपयोग होत नसताना बघून मग नेत्यांचे विक पाइंट बाहेर काढण्याच्या धमक्या देत ब्लॅकमेल करूनही तिकीट मिळवली. एवढं करूनही पदरात काहीच पडलं नाही तर आता बंडखोरीची भाषा सुरू केली केली आहे. नेत्यांनी सोईची बडदास्त केली तर हे बरेच बंडोबा गारही होतील!
Tags :
Comments