राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी काका कोयटे
कार्याध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन, तर शशिकांत राजोबा महासचिव
कोपरगाव । वीरभूमी - 03-Jan, 2023, 11:38 PM
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली. पुण्यात मंगळवारी झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. त्यात एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यात काका कोयटे (अहमदनगर) यांची अध्यक्षपदी, अॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी) यांची कार्याध्यक्षपदी, शशिकांत राजोबा (सांगली) यांची महासचिवपदी, वसंतराव शिंदे (मुंबई) व डॉ. शांतीलाल सिंगी (औरंगाबाद) यांची उपाध्यक्षपदी, दादाराव तुपकर (जालना) यांची खजिनदारपदी, सुरेश पाटील (रायगड), अॅड. अंजली पाटील (नाशिक), चंद्रकांत वंजारी (ठाणे) व नारायण वाजे (नाशिक) यांची उपकार्याध्यक्षपदी, भारती मुथा (पुणे), शरद जाधव (पालघर), जवाहर छाबडा (कोल्हापूर) व भास्कर बांगर (पुणे) यांची सहसचिवपदी, तर राजुदास जाधव (यवतमाळ) यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली.
उप निबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नवनिर्वाचित पदाधिकार्यांसह सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, फेडरेशनचे संचालक राधेश्याम चांडक (बुलडाणा), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, तसेच सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
1980 साली मुंबईत स्थापन झालेल्या या फेडरेशनचा काका कोयटे यांनी अध्यक्ष झाल्यापासून राज्यभर विस्तार केला. त्यांनी पतसंस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून, नुकतीच अंशदान वसुलीच्या निर्णयाला स्थगिती मिळविल्याने राज्यभरातील पतसंस्थांचे 217 कोटी रुपये वाचले आहेत. या निर्णयामुळे फेडरेशनच्या कामाबाबत पतसंस्था विशेष समाधानी आहेत.
विद्यमान अध्यक्ष असलेले काका कोयटे यांनी फेडरेशनवर 1990 सालापासून संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले असून, गेली 14 वर्षे ते अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. त्यांची समता पतसंस्थाही तंत्रस्नेही व ग्राहकप्रिय असून, संस्थेकडे 748 कोटींच्या ठेवी आहेत. या संस्थेने 549 कोटींची कर्जे वितरित केली असून, त्यात 222 कोटींची निव्वळ सोनेतारण कर्जे आहेत. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमअंतर्गत संस्थेकडील 99.67 टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी 24 लाख रुपयांच्या ठेवींना संरक्षण देण्यात आले आहे. हाच पॅटर्न राज्यभरातील पतसंस्थांना लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे काका कोयटे यांनी सांगितले.
राज्यभर 16 हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणार्या या संस्थांचे सव्वा दोन कोटी सभासद असून, दोन लाखांवर पदाधिकारी आहेत. या 16 हजार संस्थांच्या तब्बल 50 हजार शाखा आहेत. त्यातील दोन लाख दैनंदिन ठेव प्रतिनिधींमार्फत राज्यभरातील एक कोटी कुटुंबांशी, म्हणजेच सुमारे तीन ते चार कोटी व्यक्तींशी या पतसंस्था चळवळीचा संपर्क येतो. फेडरेशनने शिर्डी येथे बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या सहकार्याने स्वत:चे अद्ययावत व सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्रही उभारले आहे.
या फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुरेखा लवांडे गेली 14 वर्षे समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील पतसंस्थांनी पुन्हा एकदा त्यांचा प्रतिनिधी होण्याचा बहुमान दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. ही निवड होण्यात सर्व नवीन संचालकांबरोबरच सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचेही सहकार्य लाभले.
यापुढील काळात प्राप्तिकर खात्याकडून येणार्या नोटिसांबद्दलही मार्चअखेरपर्यंत दिलासादायक निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. आयकर खात्याने दिलासा न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल. मी माझे सर्वस्व पतसंस्थांसाठीच दिले आहे. आजवर दरवर्षी मी फक्त पतसंस्थांसाठी एक लाख किलोमीटरची प्रवास करायचो, यापुढेही तो कायम राहील. - काका कोयटे, नवनियुक्त अध्यक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशन
cprfIKnD