विजय उंडे । वीरभूमी - 06-Jan, 2023, 08:21 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अनेक नेते राज्याच्या राजकारणात पवार घराण्याशी चांगले संबंध ठेवून आहेत. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात हेच नेते विखे कुटुंबाशी घरोबा करून आहेत. श्रीगोंद्यात खा. सुजय विखे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केल्याने अनेक नेत्यांची पंचाईत झाली. अन् या नेत्यांनी कार्यक्रमाला दांडी मारणे पसंत केले.
गेल्या दोन दशकांपासून राज्याच्या राजकारणात पवार व विखे घराण्यात शीतयुद्ध चालू आहे. कै. बाळासाहेब विखे पाटील व जेष्ठ नेते शरदराव पवार यांच्यात झालेला टोकाचा संघर्ष राज्याने अनुभवला आहे. तो संघर्ष पुढच्या पिढीतही चालू आहे. पवारांविरोधातील एकही संधी सोडायला विखे तयार नाहीत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केले. त्या विरोधात खा. सुजय विखे यांनी थेट श्रीगोंद्यात येऊन आंदोलन केले. या आंदोलनामागे अनेक राजकीय कंगोरे असल्याचे बोलले जाते. श्रीगोंद्यात आंदोलन करून खा. सुजय विखे यांनी पवारांची मांडवली करणार्या नेत्यांना उघडे करण्याचा डाव खेळला असल्याचे राजकीय चर्चा आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहाद्दूर गडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने अमानुष छळ केल्याचे इतिहास सांगतो. त्याच बहाद्दूर गडावर आंदोलन करून खा. विखे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा कडेलोट केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार खा. विखे यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.
ज्येष्ठ नेते केशवभाऊ मगर, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब गिरमकर व नागवडे कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन जिजाबापू शिंदे यांनी भाषण करण्याचे टाळले. अजित पवारांविरोधी असलेल्या या आंदोलनामुळे या नेत्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग न घेतल्याचे आता बोलले जात आहे.
आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता आ. बबनराव पाचपुते यांच्या विरोधात तालुक्यात मोट बांधण्यासाठी पवार कुटुंबाची मदत या नेत्यांना आवश्यक आहे. तालुक्याच्या राजकारणात आ. बबनराव पाचपुते यांना विरोध करत जिल्ह्यात मात्र विखे कुटुंबाची मदत हे नेते घेतात.
तालुक्यापासून ते गाव पातळीच्या राजकारणात विखेंचा वरदहस्त या नेत्यांवर असतो. चाणाक्ष खा. सुजय विखे यांनी हा आंदोलन कार्यक्रम घेऊन अनेकांना उघडे केली असल्याची खमंग चर्चा श्रीगोंदा तालुक्यात सुरू आहे.
अण्णासाहेब शेलार कट्टर विखे समर्थक की पवार समर्थक? याचे कोडे उलगडता उलगडेना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार जिल्ह्याच्या राजकारणात विखेंचे नेत्रृत्व मान्य करतात. तालुक्याच्या राजकारणात आ. पाचपुते विरोधी भूमिका घेऊन माजी आमदार राहुल जगताप यांच्याशी एकनिष्ठ राहतात. तालुक्याच्या राजकारणात कधी सवतासुभा असल्याची आरोळी ठोकतात. पहिलवानकी केलेले अण्णासाहेब शेलार राजकारणात एवढे चतुर आणि मुत्सद्दी आहेत की, राजकीय डावपेचात आजपर्यंत ते कोणालाही सापडले नाहीत. खा. विखे यांचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधातील आंदोलनापासून श्री. शेलार यांनी दूर राहून आपल्या राजकीय डावपेचाची पुन्हा एकदा झलक दाखवली.
Comments