राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई । वीरभूमी- 22-Feb, 2023, 03:02 PM
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर रेशनकार्ड धारकांना दिवाळीच्या काळात शंभर रुपयांत आनंदाचा शिधा उपलब्ध करुन दिला होता. त्याचप्रमाणे येणार्या गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत 100 रुपयांत आनंद शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याचा 1 कोटी 63 लाख रेशन कार्डधारकांना लाभ होणार आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे.
तसेच ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा आनंदचा शिधा वाटप केला जाणार आहे. हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.
Comments