विजय उंडे । वीरभूमी- 03-Apr, 2023, 11:32 PM
श्रीगोंदा ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढत चालली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (3 एप्रिल रोजी) विक्रमी 281 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करणार्या प्रमुखांमध्ये काष्टीचे सरपंच साजन पाचपुते, महाराष्ट्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, त्यांचे चिरंजीव मितेश नहाटा, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, बाजार समितीचे विद्यमान चेअरमन संजय जामदार, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक वैभव पाचपुते, शेतकरी नेते राजेंद्र मस्के, माजी नगराध्यक्षा छाया गोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या उमेदवारीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रथमतः मोठ्या प्रमाणात गाजण्याची चिन्हे आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनी तालुका स्तरावरील अनेक संस्था सहमती पॅनलच्या नावाखाली बिनविरोध केल्या. सहमतीच्या नावाखाली आपल्याच बगलबच्चांना संधी देऊन तेच तेच चेहरे मतदारांवर लादल्यामुळे तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्त्यांनी चिडून बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विक्रमी अर्ज दाखल केल्याने आता बिनविरोधच्या आशा मावळल्या आहेत.
नेत्यांनी ऐनवेळी कितीही सहमती करण्याचा प्रयत्न केला तरी निवडणुक बिनविरोध होऊच शकत नाही. असे स्पष्ट या विक्रमी निवडणुक अर्जांवरून जाणवते. या निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे सर्व पॅनलकडून आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने निवडणुका बिनविरोध होत असल्याने बिनविरोधच्या नावाखाली मलिदा घेऊन उमेदवारी अर्ज माघारी घेणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा चंगळवादी उमेदवारांनी आपले अर्ज वेगवेगळ्या ठिकाणी भरले आहेत. ही निवडणूक चुरशीची ठरणार यात तिळमात्र शंका नाही.
दिवसा एका नेत्याबरोबर दिसणारे कार्यकर्ते रात्री दुसर्या नेत्यांच्या खलबतात व्यस्त : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात विशेषतः मार्केट कमिटीच्या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते दिवसा आपल्या नेत्यांबरोबर राहून निष्ठावानाचा आव आणतात. मात्र रात्री दुसर्या नेत्यांबरोबर खलबते करून सोज्वळतेचा रंग पांघरतात. हेच कार्यकर्ते आपल्या नेत्याचा कधी ‘घाटात दिवस मावळवतील’ याचा भरोसा सध्या तरी कुणी देऊ शकत नाही.
इच्छुकांच्या भाऊगर्दीने उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल : सहकारी संस्था मतदारसंघांमध्ये सर्वसाधारण 7, महिला प्रतिनीधी 2, इतर मागास प्रवर्ग 1 व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी 1 अशा 11 जागांसाठी एकूण 191 अर्ज दाखल, ग्रामपंचायत मतदार संघामध्ये सर्वसाधारण 2, अनुसुचित जाती जमातीसाठी 1 व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी 1 अशा 4 जागांसाठी एकूण 66 अर्ज दाखल, आडते व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण 2 जागेसाठी 18 अर्ज दाखल तर हमाल मापाडी मतदारसंघांमध्ये 1 जागेसाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण 18 जागांसाठी 281 विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.
xDkcgdKfBIz