हॅलो मी अण्णा बोलतोय!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांचेकडून श्रीगोंदा - नगर विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांसाठी केले मोबाईल अॅप लाँच
विजय उंडे । वीरभूमी - 26-Apr, 2023, 08:01 AM
श्रीगोंदा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी मंगळवार दि.२५ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा - नगर विधानसभा मतदारसंघाच्या १५३ गावांमधील नागरिकांच्या वीज, पाणी, प्रशासकीय समस्या व शेतकऱ्यांसाठी " हॅलो अण्णा !! "हे मोबाईल ॲप लाँच करण्याची घोषणा केली असून अद्याप कुठलीही सत्ता नसताना गेल्या ३७ वर्षांपासून केवळ नागरिकांच्या प्रश्नांवर संघर्ष करत असताना आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी व प्रत्येकाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे मोबाईल ॲप लाँच करत असल्याचे श्री. शेलार यांनी जाहीर केले.
वाढदिवसाचे औचित्य साधत घनशाम शेलार यांनी श्रीगोंदा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी श्री. शेलार म्हणाले की श्रीगोंदा - नगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी ३० मार्च पासून परीवर्तन संवाद यात्रा सुरु केली असून २५ दिवसात १५३ गावांपैकी १२० गावांची यात्रा पूर्ण झाली असून श्रीगोंदा तालुक्यातील ३३ गावे राहिली आहेत. त्यांचाही दौरा लवकरच पार पाडणार आहे. यावेळी यात्रेच्या आठवणी सांगताना शेलार म्हणाले की मी ३७ वर्षांपूर्वी राजकारण,समाजकारण सुरू केले होते. त्यावेळस पासून प्रत्येक गावात गेलो आहे. पण त्यावेळेस पासून आजपर्यंत या गावांमधील समस्या "जैसे थेच "आहेत. अद्यापही अनेक गावे मूलभूत प्रश्न व विकासापासून कैक मैल दूर आहेत.
मला संवाद यात्रेत भयानक परिस्थिती जाणवली. वीज, पाणी, रस्ते, तरुणांचा रोजगार यांची परिस्थिती गेल्या चाळीस वर्षांपासून बदलली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीचे, कांद्याचे अनुदान मिळाले नाही. श्रीमंत, जमीनदार लोकांना रेशनकार्ड, आधारकार्ड आहे पण अनेक भूमिहीन, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना अजूनही शासनाचे रेशनकार्ड, आधारकार्ड मिळाले नाही. आज काही लोकांची परिस्थिती सुदान देशापेक्षाही भयानक आहे. या सर्व परिस्थितीला अनेकवेळा आमदार, मंत्रीपदे भोगणारे जबाबदार असून त्यांनी नाकर्तेपणाची जबाबदारी घेतलीच नाही. यावेळी घनशाम शेलार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी दिवसभर नागरिकांची रीघ लागली होती.
कुठलेही पद नसताना केवळ नागरिकांसाठी संघर्ष करतच राहणार घनश्याम शेलार म्हणाले की, कुकडी - घोड प्रकल्पामुळे समृद्धी आली पण जमीनदार, श्रीमंत लोकं वगळता लाखो लोक अजूनही जगण्याची लढाऊ लढत आहेत. अनेक लोकांना साधे रेशनकार्ड, आधारकार्ड सुद्धा नाही. तालुक्यात मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार आहे. आ. पाचपुते यांचे नाव न घेता शेलार यांनी टीका केली की आजपर्यंत त्यांनी फक्त एमआयडीसी, सहकारी कुक्कुट पालन, केकताडापासून वाक निर्मिती कारखाना, कृषी विद्यापीठ व अनेक वल्गना केल्या. मात्र चाळीस वर्षात करमणूक सोडून कुठलाच धंदा केला नाही. मी 37 वर्षांपासून कुठलीही सत्ता नसताना थेट लोकांच्या समस्यांसाठी संघर्ष केला आहे आणि करत राहणार. मी येणार असल्याचे समजल्यावर लोकं उन्हातान्हात माझी वाट पाहत असतात.
मी विधानभेच्या उमेदवारीचा दावेदार.. पत्रकार परिषदेत बोलताना घनशाम शेलार म्हणाले की गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी नेत्यांनी उमेदवारीस असमर्थता दर्शविली. मात्र कमी वेळ मिळूनही माझा निसटता पराभव झाल्यामुळे व मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीचा दावेदार नक्कीच आहे. परिवर्तन संवाद यात्रेत लोकांचा माझ्यावर विश्वास असल्याने त्यांनी मोठा प्रतिसाद देत आहेत. लोकांच्या समस्यांसाठी मोबाईल प लाँच करून थेट लोकांच्या समस्या जाणुन घेऊन सर्व पातळीवर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील व संघर्ष करत राहणार आहे.
Comments