पाथर्डी । प्रतिनिधी - 22-Jun, 2023, 11:14 PM
पाथर्डी शहराजवळील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहिरीत चार मृतदेह आढळले आहेत. पोल्ट्रीफार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील एक महीला, तिचा एक मुलगा व दोन मुली अशी तीन मुले या चौघांचे मृतदेह विहिरीत सापडले आहेत. या घटनेने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी मयत महीलेच्या पतीला ताब्यात घेतले असून चौघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दीपक गोळक यांचा माळीबाभुळगाव हद्दीत फ्लाईंगबर्ड शाळेच्या पाठीमागे पोल्ट्रीफार्मचा उद्योग आहे. तेथे पाच कुटुंब व इतर पाचजण राहतात. त्यातील एक कुटुंब धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सागडे, मुलगी निषीधा व संचिता असे राहत होते. धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला. झोपल्यानंतर पुन्हा नवरा बायकोत वाद झाल्याचे समजते.
त्यानंतर सकाळी पोल्ट्रीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरु करायला गेला होता. तेव्हा निषीधा धम्मपाल सांगडे (वय दीड वर्षे) हीचा मृतदेह विहरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला..... पोल्ट्रीफार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, स.पो.नि. रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, पोलीस कर्मचाऱी सुरेश बाबर, कृष्णा बडे असे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. विहिरीत 30 ते 35 फुट पाणी होते.
विजपंपाच्या सहाय्याने सलग तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे (वय 26 वर्षे), निखील धम्मपाल सांगडे (वय 6 वर्षे), संचिता धम्मपाल सांगडे (वय 4 वर्षे) असे तिघांचे मृतदेह सापडले. कांचन व तिचे तिनही मुले विहिरीत मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी मयत कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. चौघांच्या मृतदेहाचे पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
धम्मपाल सांगडे (वय-30 वर्षे) हा करोडी, ता. हादगाव, जि. नांदेड येथील मुळ रहीवाशी आहे. तो बायको कांचन व एक मुलगा, दोन मुली यांना घेवुन दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीने काम करीत होता. धम्मपाल हा व्यसनी असल्याचे पोलिस तपासात समजले आहे.पोलिसांनी धम्मपालला ताब्यात घेतले आहे. मृत महीलेचे नातेवाईक आल्यानंतरच पुढील कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.
n2wb9z