रामगीरबाबा टेकडी परिसरात राहणार्या कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर
या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी । साडे पंचवीस हजार चौरसफुटाची टेकडीचा 8 हजार चौरसफुट परिसर पोखरली
पाथर्डी । वीरभूमी - 23-Jul, 2023, 01:00 PM
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर शहरातील ग्रामदैवताच्या नावाने ओळखल्या जाणार्या ‘रामगिरी बाबा’ टेकडीच्या मधोमध परिसरातील अत्यंत धोकादायक परिस्थितीत वास्तव्य करणार्या सुमारे 100 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर आला असून येथील रहिवाशांपुढे जगावे कसे? असा प्रश्न उभा राहिला आहे. मोठी दुर्घटना घडण्याअगोदरच या वस्तीचे पुनर्वसन होण्याची गरज आहे.
शहराच्या अगदी मध्यवस्तीत 25 हजार 500 चौरस मीटर एवढ्या मोठ्या आकाराची मुरमाड दगडांची टेकडी आहे. रामगिरी बाबा टेकडी नावाने ओळखल्या जाणार्या टेकडीला सर्व बाजूंनी विविध कारणांनी पोखरले जाऊन सुमारे 8 हजार चौरस मीटरची टेकडी पोखरली गेली आहे. त्यातच आणखी गमतीचा भाग म्हणजे खुलेनाट्यगृह सुद्धा याच टेकडीला पोखरून बांधले गेले आहे. यात्रेतील राहाट पाळणे लागतात.
त्या बाजूने पोखरल्या गेलेल्या डोंगराचा वापर यात्रेसाठी होऊन विकास कामाच्या नावाखाली अत्यंत चुकीच्या पद्धतीने बे मालूमपणे डोंगर उकरला गेला. पहिल्या पायरी पासून असलेल्या डोंगर निम्म्या पायर्यांपर्यंत पोखरला गेला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने तर अत्यंत धोकादायक पद्धतीने काही गरजू कुटुंबे तेथे जागा करून राहतात. ग्रामपंचायत काळात यातील काही भागाची खाजगी व्यक्तींच्या नावावर नोंद झाली असून, उर्वरित मालकी राज्य शासनाची होती.
सुमारे 12 वर्षांपूर्वी ही टेकडी पालिकेकडे वर्ग करण्यात आली. पालिका प्रशासनाने बर्याच वर्षांपूर्वी येथील काही रहिवाशांना नोटीस देऊन जागा खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर असा काही प्रसंग उद्भवल्यास तोंडी सूचना देऊन वेळ मारून नेली जाते. त्यानंतरच्या काळात या डोंगरावर प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाची टाकी उभारताना पृष्ठभाग उकारला गेला. आता नव्याने वाढीव पाणीपुरवठा विभागाच्या दुसर्या टाकीचे काम सुद्धा जुन्या टाकीच्या बाजूला होऊन, त्यासाठी सुद्धा मोठे खोदकाम झाले आहे. त्यामुळे पृष्ठभागावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर डोंगरात मूरते आहे.
टाक्या होण्यापूर्वी जोरदार पाऊस झाल्यास वेगाने येथून पाणी वाहून रस्त्यावर येई. आता पाणी वाहून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अर्थ टेकडीमध्ये पाणी मुरते आहे. खालील बाजूने मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरला जाऊन आजच आयताकृती छत्रीसारखा आकार बनुन पायथ्याकडील बाजू आता तर डोक्याचा भाग पायथ्यापेक्षा पुढे आलेला आहे.
येथील रहिवाशांना कसल्याही नागरी सुविधा नाहीत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. डोंगराच्या जागेसह तेथील शासकीय बांधकामे, खाजगी बांधकामे, यासह गरजू व्यक्तींना डोंगर पोखरून केलेली जागा याचे तांत्रिक सर्वेक्षण अद्याप पर्यंत झालेले नाही. बांधकामे करताना डोंगराच्या मजबुतीच्या विषयाचा कोणी अभ्यास केला नाही. काही दुर्घटना घडल्यास डोंगर पायथ्याला राहणार्या रहिवाशांनाही मोठा धोका होणार आहे. ज्यावेळी डोंगर पोखरला जात होता, त्यावेळी जागरूक नागरिकांनी तालुका प्रशासनाचे लक्ष वेधूनही दखल घेतली गेली नाही.
तालुका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने हालचाली करून जीव मुठीत धरून राहणार्या लोकांच्या जीवाचा विचार करून कोणतीही दुर्घटना घडणे अगोदर उपाययोजना करण्याची गरज आहे.
तालुक्यातील अंगणवाडी परिसरातील वाघदरा, काकडदरा, महालदारा, सोनारवाडी, मोहरी परिसरातील गोसावी वस्ती, डोईफोडे वस्ती, खटके वस्ती आदींचा काही भाग. चिचोंडी परिसरातील लोहसर तालुका प्रशासनाने विशेष सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. या भागात सुद्धा डोंगर माथ्यावर अनेक कुटुंबांचे वास्तव्य धोकादायक पद्धतीने झाले आहे.
Comments