श्रीगोंदा । वीरभूमी - 11-Oct, 2023, 09:09 AM
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा या ठिकाणी मंगळवारी रात्री साडे सातच्या सुमारास मढेवडगाव- चिंभळा रस्त्यावरील हॉटेल पन्हाळा येथे संतोष ऊर्फ लाला बबन गायकवाड (वय 30 वर्षे, रा. चिंभळा) यांच्यावर जयदीप दत्तात्रय सुरमकर (रा. चिंभळा) याने सहा गोळ्या झाडल्या. जखमी लाला गायकवाड यांना तातडीने पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्याबरोबर असलेले तीघेजण बालंबाल बचावले.
याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात सुनिल राजू गायकवाड यांनी फिर्याद नोंदवली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पन्हाळा हॉटेलवर शेत जमिनीच्या वादाबाबत चर्चा चालू असताना आरोपी जयदीप सुरमकर याने पिस्तूल काढून लाला गायकवाड याच्यावर गोळीबार केला.
लाला गायकवाड याच्यावर गोळीबार होताच ते हॉटेलच्या तारेच्या कंपाऊंडवरून जिवाच्या भीतीने मढेवडगावच्या दिशेने पळत सुटले. यावेळी जयदीप सुरमकर याने लाला यांचा पाठलाग करून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर, कानावर, डाव्या हाताच्या दंडावर, हाताच्या पंजावर उजव्या पायाच्या खुब्यावर तसेच गुप्त भागावर गोळ्या झाडल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांना खबर मिळताच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
रात्री उशिरा नगर येथील फॉरेन्सिक लॅब पथक, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, बेलवंडी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरिक्षक प्रकाश चाटे, मोहन गाजरे, समीर अभंग, रोहिदास झुंजार घटनास्थळी येऊन तपास करत होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व उपनिरिक्षक मोहन गाजरे करत आहेत.
या घटनेमुळे चिंभळा परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. फिर्यादीमध्ये जमिनीच्या वादाचे कारण दिले असले तरी पैशाच्या देवाणघेवाणीतून हा वाद झाल्याची चर्चा चिंभळा परिसरात आहे. पैशाच्या हव्यासातून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याची खमंग चर्चा परिसरात आहे. या गोळीबारामागे खरा सूत्रधार वेगळाच असून तो शोधण्यासाठी बेलवंडी पोलिसांची कसोटी लागणार आहे.
चिंभळा व हंगेवाडी परिसरात अनेकांकडे गावठी कट्टे...!!! : चिंभळा व हंगेवाडी परिसरामध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती राहतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे आहेत. या गावठी कट्ट्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करणे, चोर्या मार्या करणे असे धंदे सर्रास चालु आहेत. सावकारी करण्याच्या उद्देशाने जमिनीचे दस्त ऐवज करून घेऊन जमीन परत करण्याच्या मोबदल्यापोटी मुळ मालकाकडून अव्वाच्या सव्वा रकमा उकळल्या जात आहेत. हा सर्व पैसा गुन्हेगारी मार्गातून येत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी यवत व मढेवडगाव येथील एटीम फोडले गेले त्यातही हंगेवाडी परिसरातील गुन्हेगारांचा संबंध होता. याबाबी यवत पोलिसांनी निष्पन्न केल्या आहेत. गावठी कट्ट्याविरोधात पोलिसांनी खरोखरच मोहीम राबवली तर त्यांच्या हाती मोठे घबाड लागेल.
Comments