अहिल्यानगर । वीरभूमी- 28-Oct, 2024, 11:15 PM
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 12 मतदारसंघातील महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले होते. मात्र संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूर मतदारसंघावर कोणाचा हक्क याबाबत महायुतीत मेळ नसल्याचे बोलले जात होते. मात्र आज शिवसेना शिंदे गटाने या तीनही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये संगमनेरमधून अमोल धोंडीबा खताळ, श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब मल्हारी कांबळे आणि नेवासा मतदारसंघात विठ्ठलराव वकीलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विठ्ठलराव लंघे हे भाजपा उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणुन कार्यरत होते. आता त्यांना उमेदवारी देवून शिवसेनेत घेतले आहे.
शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा व श्रीरामपूर येथून आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज सकाळीच श्रीरामपुरचे आ. लहु कानडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत हातावर घड्याळ बांधले होते. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला गेल्याने ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
त्याचप्रमाणे संगमनेर मतदारसंघातून ‘टायगर अभी जिंदा है’ असे म्हणत डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली होती. एवढेच नव्हे तर युवा संकल्प यात्रा काढून प्रचारही सुरु केला होता. आता डॉ. सुजय विखे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून आज जाहीर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे- सिंदखेडराजा ः शशिकांत नरसिंगराव खेडेकर, घनसवांगी ः हिकमत बळीराम उढाण, कन्नड ः संजना जाधव, कल्याण ग्रामीण ः राजेश गोवर्धन मोरे, भांडूप पश्चिम ः अशोक धर्मराज पाटील, मुंबादेवी ः शायना एन.सी., संगमनेर ः अमोल धोंडीबा खताळ, श्रीरामपूर ः भाऊसाहेब मल्हारी कांबळे, नेवासा ः विठ्ठलराव वकीलराव लंघे, धाराशिव ः अजित बाप्पासाहेब पिंगळे, करमाळा ः दिग्विजय बागल, बार्शी ः राजेंद्र विठ्ठल राऊत, गुहागर ः राजेश रामचंद्र बेंडल यांची नावे आहेत.
तर हातकणंगले मतदार संघ मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाला दिला असून तेथे अशोकराव माने यांना तर शिरोळ मतदारसंघ राजश्री शाहुविकास आघाडीला दिला असून येथे राजेंद्र शामगोंडा पाटील येड्रावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Comments