'अभिनय' ते 'कलादिग्दर्शन' कलात्मकरीत्या मांडणारा 'पोस्टर बॉय' - आनंद वाघ
फिल्मीस्टार
आशिष निनगुरकर - मो. ९०२२८७९९०४ 14-Jun, 2020, 12:00 AM
आजकालच्या चित्रपटात सर्वात शेवटी नायकांपासुन स्पॉटबॉय पर्यंत सर्वांची नावं दिली जातात ही मेहेरबानीच आहे, पण ती वाचायला प्रेक्षक शेवटपर्यंत थांबत नाही हे दुर्देवच आहे. ही चित्रपटसृष्टी हजारो अज्ञात लोकांच्या जिवावर उभी राहते. पडद्यावर दिसणार्या कलाकारांनाच आपण ओळखतो. पण, पडद्याच्या मागे अनेकजण अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यापैकी सर्वात महत्वाची भूमिका असते ती 'पोस्टर डिझायनर'ची. सिनेमाच्या पोस्टरवरुनच तो सिनेमा हिट होणार की फ्लॉप होणार याचा अंदाज बांधला जातो. विविध फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळवणार्या चित्रपटांची व सामाजिक प्रश्नांची वस्तुनिष्ठ मांडणी करणार्या लघुपट व माहितीपटांचे 'पब्लिसिटी डिझाईन' तो गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे. उत्तम चित्रकार, मनस्वी कलादिग्दर्शक,आकर्षक पोस्टर डिझायनर व त्या जोडीला सकस अभिनय अशा सर्वच क्षेत्रात पारंगत असणारा व मैत्रीला जपणारा हा हरहुन्नरी कलावंत म्हणजेच आजचा फिल्मीस्टार 'आनंद वाघ.'आनंदचा जन्म राहुरीत झाला. आई शिक्षिका असल्यामुळे आनंदचे शिक्षण उत्तमरीत्या पार पडले. नवोदय विद्यालयात अॅडमिशन मिळवणारा आनंद लहानपणापासूनच अभ्यासात व ईतर विविध कलांमधे हुशार होता. त्याने लहानपणीच राहुरीत एक अभिनय शिबीर केले. राहुरीच्या साई गजानन चित्रकला महाविद्यालय येथे 'फाऊंडेशन'चा कोर्स पूर्ण करून तो नवीन काहीतरी करण्यासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला. पुण्याच्या विश्वकर्मा कॉलेजमध्ये त्याने 'बॅचलर ऑफ़ फाईन आर्ट्स' पूर्ण केले.एटीडी केले. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने नववीला असताना आनंदने त्याच्या आयुष्यातील पहिली ऑडिशन दिली.अभिनेते गोविंदा हे त्याचे आवडते अभिनेते. राहुरीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्यांनंतर त्याला त्याची वाट गवसली. पुण्यात असतांना मग त्याने नाटकाचा ग्रुप जॉईन केला. मग सर्व नाट्यवेडे कलावंत एकत्र आल्याने विविध ऑडिशनला जाणे सुरु झाले. त्यादरम्यान त्याच्या अनेकांशी ओळखी झाल्या. पुण्यात स्ट्रगल करणे काही सोपे नाही,त्याने २ वर्षे एका कंपनीमध्ये जॉब केला. परंतु कलेची आवड त्याला स्वस्थ बसू देईना. त्यादरम्यान आनंदला प्रवीण चौघुले दिग्दर्शित 'रान' हा चित्रपट भेटला. संपूर्ण चित्रपटात ९ विशेष लोकांमध्ये त्याची भूमिका होती. या चित्रपटाच्या अनुभवाने त्याला नवा आत्मविश्वास मिळाला. मग त्याने 'बायकर्स अड्डा,इपितर,माणूस एक माती व गोगलगांव' अशा अनेक चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिका केल्या. 'लक्ष्य' मालिकेत देखील त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण चित्रपटसृष्टीत खरा संघर्ष करण्यासाठी त्याला मुंबईला जावे लागणार होते, पण 'पुणे ते मुंबई' हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता.
त्यावेळी २०१५-२०१६ ला 'रायरंद' या मी लिहिलेल्या चित्रपटाची तयारी सुरु केली होती. तेव्हा माझा राहुरीचा मित्र अभिषेक शिंदे यांच्या ओळखीने माझी आणि आनंदची ओळख झाली. लांब केस,चेहरा गोल,डोळ्याला भारदस्त गॉगल अशी त्याची जबराट पर्सन्यालिटी मला विशेष भावली. मी लिहिलेल्या 'रायरंद' या चित्रपटातील मुख्य खलनायक असाच हवा होता. टिपिकल रावडी. त्या चित्रपटातील 'भोग्यादादा पवार' हा गावठी खलनायक त्याने उत्तमरीत्या निभावला. या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला एक नवा खलनायक दिला अशी तारीफ खुद्द अनंत जोग व संगीतकार विकास जोशी यांनी केली. या चित्रपटाने आनंदला संपूर्ण नगर जिल्ह्यात व महाराष्ट्रात एक नवी ओळख दिली. आता त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला. कॅमेरासमोर तो सराईतपणे वावरायला लागला. त्याचा अभिनय खुलत गेला. हे सर्व करत असताना त्याने सुरुवात म्हणून 'रायरंद' चे पब्लिसिटी पोस्टर बनवायला घेतले. एकेक पोस्टरमध्ये आनंदची एक वेगळी कलात्मकता दिसायला लागली. अभिनयाबरोबर त्याच्या 'पोस्टर डिझाइन'ची तारीफ व्हायला लागली. त्याची प्रामाणिक मेहनत फळाला येत होती. 'रायरंद' या चित्रपटाचा पहिला प्रीमियर राहुरीच्या ज्ञानेश्वर चित्रमंदिरात पार पडला,तेव्हा आनंदला बघण्यासाठी संपूर्ण वाघ कुटुंब व त्याचा मित्रपरिवार आले होते. तेव्हा आनंदला मोठ्या पडद्यावर बघून त्या कुटूंबाच्या डोळ्यात आलेले सुखाचे आश्रू खूप काही सांगणारे होते. आनंदचे मामा या सर्व प्रोसेसमध्ये कायम आमच्या सोबत असायचे. सिनेमा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. काही दिवसांनी आनंदची प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासोबत भेट झाली तेव्हा 'रायरंद' मधील खलनायक म्हणूनच आनंदला हाक मारली. हा प्रसंग आनंदला खूप सुखावून गेला. मग त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. याचदरम्यान त्याने पंढरीच्या वारीवर सुंदर अशी 'कैवारी' शॉर्टफिल्म केली. यात त्याचा पेहराव हा अस्सल वारकरी होता. अनेकांनी या लघुपटाला विशेष दाद दिली. माझ्या 'न भेटलेली तू' या कवितासंग्रहाचे उत्तम असे पोस्टर देखील त्याने डिझाईन केले आहे.
'एक होतं पाणी' या चित्रपटाचे लेखन करतांना मी आनंदसाठी एक खास भूमिका लिहिली. त्याने नकारात्मक भूमिका अनेक केल्या कारण त्याचा लूक तसा होता. पण 'एक होतं पाणी' या चित्रपटासाठी 'नकारात्मक ते सकारात्मक' अशा दुहेरी भूमिकेचा ताळेबंद सांगणारा रोल मी आनंदसाठी लिहिला. त्याने तो बखुबीनें निभावला. त्या भूमिकेसाठी त्याने त्याचा लूक पण बदलला. त्यावेळी अनंत जोग व उपेंद्र दाते या दिग्गज कलावंतांनी त्याच्या भूमिकेला विशेष दाद दिली. हा त्याला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे तो सांगतो. 'एक होतं पाणी' या चित्रपटाचे 'पोस्टर डिझाईन' देखील त्याने केले. या पोस्टरला अहमदनगर फिल्म फेस्टिवलमध्ये 'उत्तम पोस्टर' म्हणून देखील गौरविण्यात आले. असा त्याच्या अभिनयाचा व पोस्टर डिझाईनचा आलेख दिवसेंदिवस वाढत होता. अजित देवळे दिग्दर्शित 'मसूटा' या चित्रपटाचे पोस्टर डिझाईनचे काम त्याने केले. अनेक फेस्टिवलमध्ये त्याच्या पोस्टरची विशेष तारीफ झाली.
या लॉकडाऊनच्या काळात घरी असतांना आनंदने त्याच्या आगामी चित्रपटाचे उत्तम पोस्टर डिझाईन करून ठेवले आहेत. 'पुरुषा' या आगामी चित्रपटात त्याने कलादिग्दर्शन केले आहे. सतत नवीन काहीतरी करण्याची आस असलेला हा कलाकार स्वस्थ बसणारा नाही. अभिनय,पब्लिसिटी डिझाईन आणि आता कलादिग्दर्शन अशा सर्वच क्षेत्रात तो उत्तमरीत्या प्रामाणिक काम करत आहे. डॅशिंग पर्सन्यालिटी असलेला हा कसलेला कलावंत आहे. ग्रामीण भागातील कलेशी नाळ जोडलेला हा कलावंत मुंबई मायानगरीत आता हळूहळू स्थिरावतो आहे. त्याच्या आगामी 'पुरुषा' या सिनेमाबरोबरच 'आय प्रेम यु' या चित्रपटाची देखील उत्सुकता आहे. कारण या चित्रपटासाठी त्याने अनेक भूमिका निभावल्या आहेत. त्याच्या दृष्टीने स्ट्रगल म्हणजे 'स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने केलेला प्रवास' एवढंच म्हणावे लागेल. कलेची प्रामाणिक आवड,घरातून भेटलेला पाठिंबा व सतत नाविन्याची शोध घेणारा हा कलावंत अस्सल मातीतला हुकमी एक्का आहे. नवीन कलावंतांनी अभ्यास करून या क्षेत्रात यावे, हे क्षेत्र जेवढे चकाकते. तेवढे मेहनतीचे आहे. यश मिळवण्यासाठी झगडावे लागते, असे मानणारा हा कलाकार मनाने तितकाच मोठा आहे. आज मुंबई मायानगरीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करत आहे. सध्या लॉकडाऊन मध्ये त्याने विविध पेंटिंग्स काढले आहेत. घरी राहून घरातील अनेक कामे केली आहेत.'अभिनयापासून अगदी पोस्टर डिझाईनर' पर्यंत अशा सर्वच क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या 'आनंद वाघ' या कलाकाराला मानाचा मुजरा. त्याच्या पुढील सर्व कलाकृतींसाठी आभाळभर शुभेच्छा.
Tags :
खूप सुंदर शब्दात सिनेअभिनेता आनंद वाघ चा जीवन परिचय रेखाटला सर. आपल्या प्रोत्साहनपर लिखाणातून त्याला अधिकच नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळेल.