नगर जिल्हा
शेवगाव । वीरभूमी - 28 December, 2024
सध्या मकर संक्रांतीच्या दिवसात पतंग बाजीला शेवगाव शहरात उधाण आले आहे. मात्र पंतगबाजीच्या धुमधडाक्यात नायलॉन मांजाने एकाच्या तोंडाला कापल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी मिरी रोडवर घडली. यामध्ये अमीन फिरोज शेख (वय 16, रा. इदगाह मैदान, शेवगाव) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अमीन शेख हा न्यू आर्टस् महाविद्यालयामध्ये 12 वीचे शिक्षण घेत आहे. तो गुरुवारी शेवगाव -मिरी रस्त्याने वडुले बुद्रक (ता. शेवगाव) येथून शहराकडे येत होता. दरम्यान तो मिरी रोडवरील फलके किराणा दुकानासमोरुन जात असतांना त्याच्या तोंडाला नायलॉन मांजा अडकला.
मांजामुळे तोंडापासून ते कानापर्यंत कापले गेले. मांजा धारदार असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. वाहन वेगात असल्याने तो वाहनासह रस्त्यावर पडल्याने तो बेशुध्द पडला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित मिरी रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. यात अमीन याच्या तोंडाला आतून व बाहेरून 26 टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातातून तो वाचला असला, तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
मकर संक्रातीच्या काळात पतंग उडविणारांची संख्या शहरात वाढत आहे. त्यातच काही विक्रेते बंदी असलेल्या नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. या धारदार मांजामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याबाबत पोलिस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासनाने त्वरीत नायलॉन मांजाची विक्री करणार्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. मांजाची विक्री करणारे दुकानातील सर्व साहित्य जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.