Skip to content
Breaking Live
वाढवण बंदरात 1200 एकरावर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! प्रताप ढाकणे यांचा ‘जय श्रीराम’, मोनिका राजळे यांचा ढोल चर्चेत त्या मृतदेहाबाबत पोलिसांची महत्वाची माहिती कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी वाढवण बंदरात 1200 एकरावर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! प्रताप ढाकणे यांचा ‘जय श्रीराम’, मोनिका राजळे यांचा ढोल चर्चेत त्या मृतदेहाबाबत पोलिसांची महत्वाची माहिती कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी

प्रताप ढाकणे यांचा ‘जय श्रीराम’, मोनिका राजळे यांचा ढोल चर्चेत

पाथर्डीत रामनवमी मिरवणुकीत राजकीय चर्चांना उधाण

पाथर्डी । वीरभूमी - Mar 29, 2026 • 11:51 PM 25 views
पाथर्डी येथे पार पडलेल्या रामनवमी मिरवणुकीत यंदा धार्मिक उत्साहासोबतच राजकीय घडामोडींनाही वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी प्रथमच जाहीरपणे ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याने, तसेच आमदार मोनिका राजळे यांनी ढोल वाजवत उपस्थिती लावल्याने या मिरवणुकीची विशेष चर्चा रंगली.

मिरवणुकीत आमदार मोनिका राजळे यांनी नेहमीप्रमाणे ढोल वाजवला. मात्र यावर्षी प्रताप ढाकणे यांनी आधी ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली. ढाकणे यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला, पण ढोल वाजवणे टाळले. मिरवणुकीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ‘जय श्रीराम’ म्हणत अभिवादन केले. त्यांच्या या भूमिकेकडे अनेकांनी लक्ष वेधले.

हिंदू रक्षा मंच व हिंदुत्ववादी प्रमुख संघटनांच्या पुढाकाराने गेल्या बारा वर्षांपासून शहरात श्रीराम जन्मोत्सव व भव्य मिरवणुकीचे शानदार आयोजन होत आहे. यामुळे तरुणाईमध्येही धार्मिक विचारांची पताका रोवली जात आहे. पक्षीय राजकारणापासून हा उत्सव लांब राहिल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते यात सहभागी होतात.

यंदा सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत कार्यकर्त्यांनी वलयांकित व्यक्ती, संत-महंतांच्या चित्रफिती व्हायरल करत उत्सवपूर्व चांगले वातावरण निर्माण केले. राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यापूर्वीच्या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले होते; काही वेळा त्यांनीही ढोल वाजवला. कालच्या मिरवणुकीत मात्र कार्यकर्त्यांना मिरवणुकीची क्लिप देताना त्यांनी जय श्रीरामचा जयघोष केला. मिरवणुकीतही ते आले; मात्र ढोल वाजवला नाही. आमदार राजळे यांनी ढोल वाजवला; मात्र ढाकणे यांच्या क्लिपवर भाष्य टाळले.

रामनवमीच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे भाषणबाजीला संधी नसते. बहुतेक नेते, कार्यकर्ते, मिरवणुकीत सहभागी सर्वजण उपस्थिती लावून अस्तित्वाची जाणीव देतात. मुक्या मनाचे मुके बोल व्यक्त करायला कोणालाही संधी मिळत नाही. यंदा मात्र चित्रफितीच्या माध्यमातून अनेकांचे चेहरे मोबाईल स्क्रीनवर जय श्रीराम म्हणताना पाहून उत्सवाचे आयोजक कार्यकर्तेही सुखावले. नेटके, भव्य व शिस्तबद्ध आयोजनामुळे येथील उत्सव जिल्ह्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक मानला जातो.

अ‍ॅड. प्रताप ढाकणे गेल्या काही दिवसांपासून भाजपबरोबर लिव्ह-इन फ्रेंड रिलेशनशिप प्रमाणे राहत आहेत. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भाजपच्या उंबरठ्यावर बसल्याचे त्यांच्या बोलण्यातून लपूनही राहिलेले नाही. श्रीरामाचे नाव घेताना त्यांच्या देहबोलीत उंबरठा ओलांडण्याची ओढ अनेकांना जाणवली. मिरवणुकीइतकीच चर्चा ढाकणे यांच्या चित्रफितीची सुरू झाल्याने लिव्ह-इनचे रूपांतर गृहप्रवेशात कधी होते, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यात करंजी येथील कार्यक्रमात बोलताना आपण कुठल्याही पक्षातर्फे बोलत नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले होते. अडचणीच्या काळात मदतीचा हात देत भाजपने अप्रत्यक्षपणे प्रताप ढाकणे यांच्याबरोबरचा घरोबा मान्य केला; पण काडीमोडानंतरचा संसार साक्षीदारांसमोर सुरू व्हावा, असे वातावरण तयार झाले असताना ज्यांना मानपान द्यावा त्यातलेच काहीजण समक्ष तुतारी, तर पाठीमागे पिपाणी वाजवू लागले.

शहरात लोकनेते स्व. बबनराव ढाकणे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी ढाकणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख हवी आहे; तर आमदार मोनिका राजळे यांना लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा, पोलीस स्टेशन व पालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री हवेत. ढाकणे-मुंडे या दोन्ही नेत्यांचे संबंध शेवटच्या काही वर्षांत फारसे सलोख्याचे राहिले नव्हते. दुर्दैवाने सुमारे सहा महिन्यांपासून दोन्ही नेत्यांचे पुतळे झाकून ठेवलेले आहेत.

बजाओ ढोल स्वागत के, मेरे घर राम आये हैं अशी धून वाजवण्यासाठी तालुक्यात ढाकणे-राजळे या दोन्ही नेत्यांना ओढ लागली आहे. नगर जिल्ह्यात दोन पायांची शर्यत खेळण्याची मुख्यमंत्र्यांची मानसिकता अद्याप दिसत नाही. ढाकणे यांच्या पक्षप्रवेशाच्या रिक्षाची मागील दोन चाके दोन्ही नेत्यांनी ताकदीने फिरवली, तरी पुढचे चाक प्रवरेचे आहे व एक्सिलरेटर परळीचे आहे. हा गुंता कसा सुटणार आणि सहमतीची रिक्षा कशी धावणार, हा प्रश्न राजकीय अभ्यासकांना पडला आहे.

मुख्यमंत्रीरूपी रामाला बोलवण्यासाठी काही रामभक्त मुंबईला गेले होते. तुम्ही आधी प्रवरास्नान करून पवित्र व्हा, प्रवरामाईचा आशीर्वाद घ्या; मग पुढे पाहू, असे सांगत पंचमुखी हनुमान सेनेला माघारी पाठवण्यात आले. त्यातच मावशीबाई सुद्धा पाथर्डीबाबत आता मोकळेपणाने बोलायला तयार नाहीत.

तालुक्यापुरते मात्र विरोधकांनाही आपलेसे करत ‘रामराज्य’ आणण्याचे आमदार मोनिका राजळे यांचे धोरण म्हणजे राजकीय हालचालींना अफूची गोळी देण्यासारखे ठरत आहे. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एखाद्या साधूच्या आश्रमासारखे वागत परस्परांतील वैर विसरले आहेत.

आमदार मोनिका राजळे यांना कार्यकर्त्यांना अधूनमधून ढोलाचे बोल ऐकवायला आवडते. काहीजण त्या तालावर डोलतात, काहींना ढोलाचा टोला बसतो, तर काहीजण रिंगणातील इतरांकडे पाहून काय करायचे ते ठरवतात. रामनवमीचा उत्सव संपला असला तरी त्यातून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांचा प्रभाव अजूनही कायम आहे. ढोलाचा आवाज थांबला असला तरी त्याचे पडसाद स्थानिक राजकारणात पुढील काळात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply