10 हजार रुपये घेतांना लाचलुचपतच्या पथकाने ठोकल्या बेड्या
अहमदनगर । वीरभूमी- 27-Apr, 2021, 12:00 AM
सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनानेही कडक लॉकडाऊन केला आहे. या काळात सर्वकाही बंद असतांना अवैध दारु विक्री व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 15 हजार रुपयेची लाच मागणारा पोलिस हवालदार 10 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत पथकाने जेरबंद केला.
या लाचखोर हवालदाराचे नाव बार्शिकर काळे असे असून तो नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत होता.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा दारुविक्री व्यवसाय आहे. सध्या सुरू असलेल्या कडक लॉकडाऊन काळात व इतर वेळेत अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी तसेच कोणतीही कारवाई करू नये म्हणुन 15 हजार रुपये हप्ता मागितला होता.
तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे आज दि. 27 रोजी तक्रारदार यांच्याकडून कॉटेज कॉर्नर येथे 10 हजार रुपयाची लाच घेतांना पोलिस हवालदार वार्शिकर काळे याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक शाम पवरे व त्यांच्या पथकाने केली.
jAJFtlgYPK