ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू
संगमनेर । वीरभूमी- 08-May, 2021, 12:00 AM
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. अपघात झाल्याने ट्रकमधील टोमॅटोचा रस्त्यावर चिखल झाला होता. यामुळे पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव (जि.पुणे) येथून आयशर कंपनीचा टेम्पो (एम.एच.15, जी.व्ही.3198) टोमॅटो घेवून नाशिकच्या दिशेने निघाला होता. दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा टेम्पो चंदनापुरी घाटातील खिंडीच्या पुढे उतारावर असतांना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यातच वाहनाला अधिक वेग असल्याने टेम्पोने रस्तादुभाजकाला जोराची धडक दिली.
टेम्पोच्या खाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाली. अपघातानंतर वाहनातील टोमॅटो रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने महामार्गावर टोमॅटोचा खच पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाचा मृतदेह अपघातग्रस्त वाहनाच्या खाली अडकल्याने तो काढण्यासाठी टोल नाक्यावरील क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या दरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतुक खोळंबल्याने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला नेईपर्यंत नाशिक बाजूने दोन्हीकडची वाहतुक वळवली होती. तासाभरानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली.
यावेळी वाहनचालकाकडे कोणतेही ओळखपत्र न सापडल्याने महामार्ग पोलिसांनी वाहनाच्या क्रमांकावरुन त्यांच्या मालकाला फोन केला असता चालकाचे नाव विष्णु पांडुरंग उंबरे (वय 35, रा. गोरडगाव, ता.सिन्नर) असल्याचे समजले. या बाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
QIfJGcHxvmXET