नागरिकांमध्ये घबराहाट । बंद घर पाहुन चोरट्यांनी मारला डल्ला
पाथर्डी । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
शहरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्या वामनभाऊ नगर मधील बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी सुट्टी निमित्त गावाकडे गेलेल्या प्राथमिक शिक्षकाच्या घरी चोरी करून सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला. भर दुपारी घडलेल्या या प्रकाराने उपनगरांमध्ये राहणार्या नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील येळी गावचे रहिवासी व सध्या पाथर्डी शहरातील वामनभाऊनगर मध्ये राहत असलेले प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर गर्जे आपल्या कुटुंबासह रविवारच्या सुट्टीनिमित्त गावाकडे गेले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डीत येऊन घर उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. 90 हजार रुपये रोख, व सुमारे 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोरोनामुळे मास्क व उन्हामुळे डोक्याभोवती कापड गुंडाळल्याने चोरट्यांच्या चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विशेष संपर्क अभियान सुरू आहे.
दरम्यान शहरांमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस पूर्णपणे असुरक्षित असून पोलिसांची दिवसभर शहरात गस्त नसते. रात्री सायरन वाजवत गाडी फिरवली जाते. पोलिसांकडे पुरेशी संख्याबळ नसल्याने दिवसा मात्र केवळ रामभरोसे नागरिक, व्यापारी व रस्त्यावरील पादचारी वावरतात.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांचे नियमबाह्य वाहनतळ व रस्त्यावरील वाढती वाहतूक यामुळे खिसेकापू, साखळीचोर, वाहनचोरी, मोबाईल चोरांना प्रभावीपणे प्रतिबंध होऊ शकत नाही. प्रमुख चौक, उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणी दिवसा पोलिसांची गस्त सुरू करून शहर पोलीस चौकी व महामार्ग वाहतूक पोलीस दल कार्यान्वित करण्याची नागरिकांची मागणी आहे.
पालिकेची सीसीटीव्ही यंत्रणा बंद
मागील वर्षी आमदार निधीतून सुमारे 30 लाख रुपये खर्चून पालिकेने शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवले. काही दिवसातच निकृष्ट यंत्रणेमुळे ही यंत्रणा बंद पडली. संपूर्ण शहरात तिसरा डोळा कार्यान्वित झाल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल अशी लोकांची अपेक्षा फोल ठरली. ’असून अडचण अन नसून खोळंबा’ अशी अवस्था होऊन पालिकेच्या कारभाराविरुद्ध नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
Comments