काँग्रेसच्या इंधन दरवाढी विरोधात आंदोलनावर खा. विखे यांची टीका
अहमदनगर । वीरभूमी- 12-Jul, 2021, 12:00 AM
पेट्रोल - डिझेलसह इंधनाचे दर वाढले हे खरे आहे. मात्र त्या बदल्यात मिळलेल्या सुविधाही पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करतांना फलक लावताना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवावे,’ असा टोला खा. सुजय विखे यांनी लगवला आहे.
विळद घाट येथील विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालयाचे अर्बन सेंटर नगर शहरात सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी खा. विखे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना वरील टीका केली.
सध्या काँग्रेसचे राज्यभर इंधन दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाबाबत बोलतांना खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, पेट्रोल - डिझेलसह इंधनाचे दर वाढले आहेत, हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही लावावेत.
देशात 35 हजार कोटी रुपये खर्चून एवढी मोठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. हेच लसीकरणाचे काम राज्य सरकारकडे होते, त्यावेळी त्यांना जागतिक निविदा काढूनही ते करता आले नाही. यामुळे केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढीवर आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या अशा जनहिताच्या कामाचीही नोंद आंदोलकांनी घेतली पाहिजे. असे सांगत काँगेसच्या आंदोलनावर टीका केली.
खा. विखे म्हणाले, सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचे भासविले जात आहे. मात्र ते सर्व नाटक सुरु आहे. राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप खा. विखे यांनी केला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून बिघाडी झाल्याचे भासवले जात असेल तरी प्रत्यक्षात हे सगळे खोटे आहे.
सर्वजण सत्तेसाठी एकत्र आलेले असून त्यांची अस्तित्वाची लढाई आहे. यामुळे एवढ्या सहजासहजी ते वेगळे होणार नाहीत. फार तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या होत स्वबळावर लढवतील. मात्र, विधानसभा, लोकसभा निवडणुकांना एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत.
राज्य सरकार राज्यातील अनेक प्रश्न हातळण्यात अपयशी ठरले आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी या वादाला हवा भरली जात असल्याचा आरोपही खा. विखे यांनी केला.
Comments