शेळीच्या पिल्लाचा पाडला फडश्या
शेवगाव । वीरभूमी- 23-Jul, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने शेळीच्या पिल्लाला झडप घालून ठार केले. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने भातकुडगाव भागात पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण होवू लागली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा संचार असल्याचे शेतकर्यांच्या निदर्शनास येत होते. अनेकवेळा बिबट्याने शेतकर्यांना दर्शनही दिले. मात्र कोणतीही हानी न झाल्याने सर्वत्र शांतता होती. मात्र या बिबट्याने भातकुडगाव येथील श्री. फटांगरे यांच्या शेळीच्या पिल्लाचा फडश्या पाडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यांत शेळीचे पिल्लू ठार झाल्याची घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तेथील ठश्यावरून हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून परिसरात पिंजरा लवला आहे.
सध्या शेतीची कामे सुरू असून शेतकर्यांनी शेतात काम करतांना विशेष खबरदारी घ्यावी. एकट्याने फिरु नये, हातात काठी ठेवावी. गळ्याला मफलर अथवा स्कार्फ गुंडाळून काम करावे. आणखी मदत लागत असल्यास शेतकर्यांनी वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments