कर्जदारांचे धाबे दणाणले । अनेकजण नॉटरिचेबल
शेवगाव । वीरभूमी- 04-Aug, 2021, 12:00 AM
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण फसवणूक प्रकरणी गोल्ड व्हँल्यूअर व 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी शेवगाव पोलिसांनी अर्बन बँकेच्या शाखेत जावून घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेत फसवणुकीची रक्कम ही 50 लाखापेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन 2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हँल्यूअर व कर्जदार यांनी संगनमत करुन बनावट दागीने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये 159 कर्जदारांचा समावेश असून त्यातील बहुतांशी कर्जदार हे एकाच कुटूंबातील पती-पत्नी, पिता-पुत्र असे आहेत. या कर्जदारांनी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर तारण ठेवलेले सोने सोडवणूक केले नाही.
बँकेने वारंवार नोटीसा पाठवून देखील कर्जदारांनी ते कर्ज न भरल्याने बँकेने अखेर तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या दरम्यान तारण ठेवलेले 364 पिशव्यातील 27 किलो 351.10 ग्रँम सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बँकेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले.
शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी 2018 ला हा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. मात्र त्यांनी मागील आठवड्यात आत्महत्या केल्याने या गैरव्यवहारास वेगळे वळण लागले. गेले काही दिवस बँक व्यवस्थपानाकडून संबंधीत प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती.
शाखा व्यवस्थापक शिंदे यांच्या आत्महत्येनंतर शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांच्या फिर्यादीवरुन सोमवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गोल्ड व्हँल्युअर व 159 कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत जावून घटनास्थळाचा पंचनामा केला.
या संदर्भातील चौकशीसाठी लागणारे कागदपत्रे शाखेतून हस्तगत केली असून गैरव्यवहारातील रक्कम ही 50 लाखापेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्या पासून कर्जदार खातेदारांचे धाबे दणाणले आहेत. तर अनेकजण नॉटरिचेबल झाले असून या कचाटयातून सोडवण्यासाठी कायदेशीर सल्लामसलती सुरु झाल्या आहेत.
तर शाखा व्वस्थापक शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल आहुजा, बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. तर अर्बन बँकेच्या नगर मुख्य शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक व चौकशी अधिकारी मनोज फिरोदीया हे चौकशीस उपस्थित राहीले नाहीत.
Comments