भंडारदरा नंतर हे धरणही ओव्हरफ्लो
अकोले । वीरभूमी- 13-Sep, 2021, 12:00 AM
भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि दुसर्याच दिवशी सोमवारी दुपारी निळवंडे धरणही भरले. या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास या धरणातून एकूण 8 हजार 144 क्युसेसने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले. त्यात वाढ करत सायंकाळी 7 वाजता 10 हजार 856 क्युसेस ने पाणी सोडण्यात येत आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे महिनाभराच्या दीर्घ विश्रांती नंतर मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी भंडारदरा धरण भरले आणि या धरणातून आज सोमवारी सायंकाळी 9 हजार 892 क्युसेसने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
या पाण्याबरोबरच निळवंडे पाणलोट क्षेत्रातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. हे सर्व पाणी निळवंडे जलाशयात अडविले जात आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास या धरणातील पाणीसाठा 94 टक्के म्हणजेच 7 हजार 731 दशलक्ष घनफुटा पर्यंत पोहचला आणि धरण तांत्रिकदृष्टया भरल्याने या धरणाच्या वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यावेळी या धरणातील विसर्ग 10 हजार 856 क्यूसेस इतका होता.
मात्र भंडारदरा धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण विभागाने तीन तासांनंतर या विसर्गात वाढ करत सायंकाळी सात वाजता तो 9 हजार 892 क्यूसेस इतका केला. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
दरम्यान भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढते आहे. भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण भरल्याने अकोले तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात सोडलेले पाणी जायकवाडी धरणाकडे झेप घेत आहे.
भंडारदरा व निळवंडे करणातून प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही धरणे भरल्याने शेतकरी वर्गात व नागरिकांत आनंदाचे वातावरण झाले आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा लागण्याची शक्यता निर्माण होईल, असे मत व्यक्त होत आहे.
Comments