पाथर्डी । वीरभूमी - 08-Oct, 2021, 12:00 AM
वीजेच्या गडगडाटासह मंगळवारी झालेल्या पावसामुळे पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या तब्बल डझनभर कर्मचार्यांनी अथक 32 तास परिश्रम घेत खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्बल 43 तास खंडीत असलेला वीजपुरवठा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री वीजेच्या गडगडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पाथर्डी येथून कासार पिंपळगाव, भोसे या वीजउपकेंद्राकडे जाणारा वीजपुरवठा मंगळवारी रात्री 8.10 वाजेच्या दरम्यान खंडीत झाला होता.
ऐन सनासुदीच्या काळात खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची टीम बुधवारी पहाटेपासूनच कामाला लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा वीजपुरवठ्यातील दोष रात्र झाली तरी सापडला नाही. यामुळे बुधवारी रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेली कारवाई गुरुवारी पहाटेपासून पुन्हा सुरू झाली.
गुरुवारीही पाथर्डी ते कासार पिंपळगाव वीजउपकेंद्रापर्यंत येणार्या लाईनचे पोल ना पोल कर्मचार्यांकडून तपासण्यात आले. अखेर गुरुवार दि. 7 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान कराडवस्ती येथे वीजपुरवठ्यामधील दोष आढळून आला. दोष पहाणी काळात तब्बल 24 पोलवरील पिन ईन्सुलेटर बदलण्यात आले.
महावितरणच्या कर्मचार्यांनी 42.30 तास बंद असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल 32 तास अथक परिक्षम घेत वीजपुरवठा सुरळीत केला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तिसगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता श्री. हितेशजी ठाकुर साहेब, करंजी विभागाचे सहाय्यक अभियंता श्री. मिश्रा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ माधव पटारे, वरीष्ट तंत्रज्ञ अनिल राजळे, प्रताप नन्नवरे, निलेश उगार, विशाल इंगळे, दीपक वेताळ, राहुल बडवे, आदिनाथ निंबाळकर, अरविंद पाठक, हनुमंत शिंदे, सोमनाथ लवांडे यांच्यासह विशेष सहकार्य संतोष शेळके, केरुबापू कर्डिले, ज्ञानेश्वर बर्डे, भारत गायकवाड, गणेश काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.
कासार पिंपळगाव व भोसे वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा सलग 43 तास खंडीत झाल्याने लाभधारक गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली होती. तसेच वीजेअभावी छोटे-मोठे व्यावसाय ठप्प झाले होते. मोबाईल चार्ज नसल्यामुळे संपर्क तुलटला होता. ऐन सनासुदीच्या काळात खंडीत झालेला वीजपुरवठा कधी सुरू होईल? असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र नवरात्रीचा पहिला दिवस असतांनाही महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्यांनी आपले कर्तव्य चोख बजावत 32 तास अथक परिश्रम घेत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी शेतीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. यामुळे वाडीवस्तीवर लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Comments