अकोले । वीरभूमी- 24-Dec, 2021, 10:47 PM
तीव्र राजकीय मतभेद असलेले भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड व राष्ट्रवादीचे नेते अशोकराव भांगरे हे दोन्ही नेते आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नांवर एकत्र आले असून आज घोरपडा देवी मंदिरात परिसरात झालेल्या मंदिराचे पुजारी मुरलीधर येडे यांच्या दशक्रिया निमित्त एका व्यासपिठावर आले असता कार्यक्रमापूर्वी एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी करून कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेते मंदिरात एकत्र आले.
सध्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये फूट पाडून गैरसमज पसरविण्याचे काम होत असून दशक्रियाविधी करायचे नाही. देव देवता मान्य नाही. अखंड हरिनाम सप्ताह करायचा नाही, असे अनेक मुद्द्यांवर आदिवासी समाजाला संभ्रमात पाडून धार्मिक आध्यात्मिक प्रश्नावर तसेच आदिवासी हक्काच्या प्रश्नावरून लक्ष्य विचलित केले जात असल्याने माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी या प्रश्नांवर कडाडून टीका केली आहे.
आदिवासी समाजाने कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता योग्य पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. समाजाने पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तालुक्यात व राज्यात आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला बिरसा ब्रिगेड करत असलेल्या कामाबद्दल कल्पना देऊन सामाजिक व धार्मिक आध्यात्मिक बाबत मार्गदर्शन केले.
त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी रंधा येथे घोरपड देवीचे पुजारी मुरलीधर येडे यांच्या दाशक्रियाविधी निमित्त अशोकराव भांगरे वैभवराव पिचड उपस्थित होते. प्रसंगी भांगरे- पिचड यांनी आदिवासींच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे ठरविले असून लवकरच सामाजिक प्रश्नावर राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर मेळाव्याचे आयोजन करून आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार आहे.
याबाबत माजी आमदार वैभवराव पिचड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सामाजिक प्रश्नांबाबत आमचे एकमत असून राजकीय पक्षाचे काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. समाजाच्या हितासाठी वंदनीय पिचड साहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. आजही या वयात ते काम करत आहेत. भांगरे साहेब आमच्या मताशी सहमत आहेत, याचा आनंदच आहे.
अशोकराव भांगरे यांनी दुजोरा देत आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या देव, धर्म, पारंपारिक चालीरीती जोपासत आला आहे.वर्षानुवर्षे तो महादेवाला मानतो. तसेच प्रत्येक आदिवासी गावात मारुती, श्रीविठ्ठल मंदिर असून या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह बसविला जाऊन त्यातून अध्यात्मिक संस्कार जोपासला जातो. त्या परंपरेला कुणी छेद देत असेल तर मान्य होणार नाही, माजीमंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करू, असे सांगितले.
राजकरणात एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी आदिवासींच्या प्रश्नांवर एका व्यासपीठावर आल्याने पिचड- भांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
Comments